| अलिबाग | प्रतिनिधी |
इर्शाळवाडीतील दुर्घटनेनंतर प्रशासन कामाला लागले आहे. इर्शाळवाडीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी जिल्ह्यातील डोंगरभागात राहणाऱ्या नागरिकांसह नदी, किनारी राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यास सुरुवात केली आहे. 285 जणांना नातेवाईकांकडे तर 12 जणांना ग्रामपंचायत शेड, जिल्हा परिषद शाळा, समाजमंदिरमध्ये सुरक्षीत ठेवण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील अलिबाग, पेण, मुरुड, सुधागड, तळा, माणगांव, महाड, पोलादपूर या तालुक्यातील एक हजार 584 जणांना सुरक्षीत ठिकाणी हालविण्याची कार्यवाही जोरात सुुरू केली आहे. गाव पातळीवर तलाठी, मंडळ अधिकारी तसेच पोलीसांच्या मदतीने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. अलिबाग तालुक्यातील सोगाव येथील 24 जणांना ग्रामपंचायतीच्या शेडमध्ये स्थलांतरीत केले आहे. खानाव येथील वेलेटवाडी येथील 104 जणांना पुनर्वसन शेडमध्ये ठेवले आहे. पेणमधील जिते येथील 20 जणांना नातेवाईकांकडे व महलमिरा, चांदेपट्टी, गावातील नागरिकांना मराठी समाज हॉलमधझ्ये तसेच तांबडी आदीवासीवाडी येथील नागरिकांना समाजमंदिरमध्ये ठेवले आहे. मुरुडमधील राजपुरी येथील दरडग्रस्त गावांतील 40 जणांना राजपुरी शाळेत व 410 जणांना नातेवाईकांकडे सुरक्षीत पाठविण्यात आले आहे.
सुधागडमधील सरसगड किल्ल्यानजीक वाघजई येथील 34 जणांना पाली येथील भक्तीनिवासमध्ये स्थलांतर केले आहे. तळामधील कडक्याची वाडी येथील शेवळे गांव, कोडखोल आदिवासीवाडी व चरई बुद्रुक येथील153 जणांना अन्य सुरक्षीत ठिकाणी हालविले आहे. माणगावमधील 37 जणांना लोणारे येथील डॉ. बाबाबासाहेब आंबेडकर तंत्र निकेतन कॉलेज व गावातील पर्यायी घरांमध्ये स्थलांतरीत केले. महाडमधील तांदळेकरवाडी, कडवेवाडी, कोथेरी, शिंगरकोंड , लोअर तुडील, कोडीवते, कोथेरी जंगमवाडीमधील नागरिकांना कॅम्पबरोबरच नातेवाईकांकडे स्थलांतरित केले. तसेच पोलादपूरमधील केवनाळे, साखर, सुतावाडी, कोंढवी मराठवाडी, कोतवाल खुर्द, कातळी कामतवाडी येथील नागरिकांना शाळा, व मंदिरांमध्ये स्थलांतरीत केले आहे. नऊ तालुक्यातील दीड हजार नागरिकांचे सुरक्षीत ठिकाणी स्थलांतर केल्याची माहिती प्रशासनाने दिली.
अलिबाग तालुक्यातील सोगाव येथे डोंगरभागात राहणाऱ्या नागरिकांचे स्थलांतर ग्रामपंचायीच्या शेडमध्ये केले आहे. खानाव येथील वेलेटवाडी येथील नागरिकांचे स्थलांतर पुनर्वसन शेडमध्ये केले आहे. या जागेची पाहणी केली असून त्याठिकाणी सुविधा उपलब्ध करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
विक्रम पाटील, तहसीलदार , अलिबाग