| अलिबाग | प्रतिनिधी |
मुरुड तालुक्यातील साळाव येथील प्रकल्प उभारणीसाठी साळाव, निडी परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी 10 वर्षापूर्वी संपादित करण्यात आल्या आहेत. मात्र आजतागायत या प्रकल्पाची उभारणी झाली नाही. त्यामुळे सरकारने त्यांच्या जमिनी तातडीने परत कराव्यात, अशी मागणी शेकापचे सरचिटणीस आ.जयंत पाटील यांनी केली आहे.
मुरुड तालुक्यातील चेहेर, नवीन चेहेर, मिठेखार, निडी, साळाव, वाघुळवाडी येथील शेतकरी भात पिकांसह अन्य पिकांची लागवड करून त्यांच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत होते. 1989 मध्ये रोजगार मिळेल या नावाखाली येथील शेतकऱ्यांच्या जमीनी भांडवलदारांनी कवडीमोल भावाने विकत घेतल्या. साळाव या ठिकाणी सुरुवातीला विक्रम इस्पात नावाचा प्रकल्प सुरु झाला. त्यानंतर हा प्रकल्प वेलस्पून मॅक्सस्टील लिमिटेडने घेतला. गेल्या काही वर्षापासून वेलस्पून कंपनीकडून जेएसडब्लू कंपनीने ही जागा अधिग्रहित केली.
पिकत्या जमीनी रोजगार मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी प्रकल्पासाठी दिल्या. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रत्येक घरातील एका व्यक्तीला नोकरी देणार, नोकरी न दिल्यास दर महिन्याला भत्ता देणार, गावांमध्ये वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करणार असा सामजंस्य करार वेलस्पून मॅक्सस्टील कंपनी प्रशासन, जमीन मालक व प्रकल्पग्रस्त शेतकरी यांच्यामध्ये झाला. परंतू या कराराचे उल्लंघन कंपनी प्रशासनाकडून करण्यात आले.
अखेर याबाबत प्रकल्प्रस्तांनी आ. जयंत पाटील यांच्याकडे हा प्रश्न मांडला. याचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रकल्पग्रस्तांच्या या प्रश्नांबाबत शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार आक्रमक झाले. प्रकल्प उभारणीसाठी घेतलेल्या जमीनीवर प्रकल्प उभा न करता त्या जमीनी पडून तशाच आहेत. त्याचा परिणाम येथील शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहावर झाला आहे. पिकत्या जमीनी गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आमदार जयंत पाटील यांनी अधिवेशनात आवाज उठवून प्रकल्पग्रस्तांच्या जमीनी परत करण्याची मागणी केली आहे