| अलिबाग | प्रमोद जाधव |
वाढत्या नागरिकीकरणामुळे भविष्यात पाण्याची समस्या निर्माण होऊ नये. शहरातील नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा व्हावा, यासाठी अलिबाग नगरपरिषदेमार्फत पाण्यासाठी 66 कोटी रुपयांचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. हा अहवाल शासनाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे. भविष्यातील वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने शहरातील नागरिकांना पाणी उपलब्ध होणार आहे.
अलिबाग शहर ऐतिसाहिक व पर्यटनाच्या दृष्टीने दिवसेंदिवस महत्वाचे ठरत आहे. शहरामध्ये जिल्हा कार्यालयांसह तालुका स्तरावरील वेगवेगळी शासकिय कार्यालये आहेत. शहरांमध्ये लहान मोठी उद्योग व्यवसाय असून महाविद्यालये आहेत . सध्या शहराची लोकसंख्या सुमारे वीस हजार आहे. शहरातील नागरिकांना एमआयडीसीमार्फत पाणी पुरवठा होतो. परंतू शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकीकरणदेखील झपाट्याने वाढत आहे. सदयस्थितीत चालू पाणीपुरवठा योजना ही 1997 ची असून शहराच्या गरजेनुसार वाढीव पाणीपुरवठा होणेे गरजेचे आहे. शहरातील नागरिकांना भविष्याच्या दृष्टीने मुबलक पाणी पुरवठा व्हावा यासाठी अलिबाग नगरपरिषदेने पुढाकार घेतला आहे.
केंद्र सरकार पुरस्कृत अमृत 2.0 अंतर्गत अलिबाग शहरासाठी सुधारित पाणीपुरवठा योजना प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. भविष्यातील पुढील 30 वर्षाच्या शहराच्या पाण्याच्या मागणीनुसार सुमारे 66 कोटी रुपयांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला आहे. तो अहवाल शासनाकडे तांत्रिक मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे. जिल्हा मुख्यालय तसेच ब वर्ग पर्यटन स्थळ अशी ओळख असणाऱ्या अलिबाग शहरासाठी स्वच्छ व सुरळीत पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून ही योजना राबविली जाणार आहे. प्रति माणसी प्रति लिटर 135 लिटर पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न असणार आहे. शहरात नागरिक राहत असले, तरीही नोकरी व्यवसायानिमित्त व पर्यटनासाठी येणाऱ्यांची संख्यादेखील प्रचंड आहे. हा विचार करून ही योजना राबविली जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी अंगाई साळुंखे यांनी दिली.
संभाव्य वाढीचा विचार करा
अलिबाग शहरानजीक चेंढरे, कुरुळ, वेश्वी ग्रामपंचायत आहेत. या ग्रामपंचायती भविष्यात अलिबाग शहरामध्ये समाविष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे नगर परिषदेच्या या ग्रामपंचायतीच्या समाविष्ठेचा विचार करून भविष्यात नागरिकांना पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी नियोजन करणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
जिल्हा मुख्यालय व पर्यटन स्थळाच्या दृष्टीने अलिबागची एक वेगळी ओळख आहे. शहराचा विस्तार होत असताना शहरातील नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा व्हावा यासाठी केंद्र सरकार पुरस्कृत अमृत 2.0 अंतर्गत शहरासाठी सुधारित पाणीपुरवठा योजना प्रकल्प प्रस्तावित केली आहे. भविष्यात शेजारी असलेल्या ग्रामपंचायती समाविष्ट झाल्यास त्यांच्यासाठी स्वतंत्र प्रस्ताव तयार करून अहवाल पाठविला जाणार आहे. त्यामुळे सध्या 30 वर्षाचा विचार करून मुबलक पाणी पुरवठा मिळावा यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
अंगाई साळुंखे – मुख्याधिकारी तथा प्रशासक, अलिबाग नगरपरिषद