| पेण | प्रतिनिधी |
जिते गावची सारा ठाकूर हिचा मन्यार सापाच्या दंशाने आज दुर्दैवी मृत्यू झाला. तिच्या मृत्यूचे कारण सर्प दंश असले तरी वेळेवर उपचार उपलब्ध झाले असते तर आज साराचे प्राण वाचले असते. जिते गावामध्ये साराला सर्पदंश झाल्यानंतर पहिल्यांदा पेण येथील जिल्हा उपरुग्णालयात नेण्यात आले.
प्राथमिक उपचार झाल्यानंतर तेथील डॉक्टरांच्या लक्षात आले की, तीची प्रकृती खालावत आहे. त्यांनी साराच्या नातेवाईकांना खासगी दवाखान्यात अथवा पुढे हलविण्याचा सल्ला दिला. त्यानंतर साराला अलिबाग जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथील आरोग्य यंत्रणेने हात वर केल्यावर साराला वाचविण्यासाठी धावपळ करत तिला अलिबागहून मुंबईकडे हलविण्यात आले. मात्र पुढे मुंबईला न नेता तिला लवकर औषधोपचार व्हावा, म्हणून कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये खूप वेळ वाया गेल्याने अखेर तिला मृत्यूनी गाठले.
पेण तालुक्यात सर्पदंश झाल्यास योग्य उपचार करण्याची यंत्रणा आजही उपलब्ध नाही. यापेक्षा दुर्दैव ते काय. वेळेवर उपचार न मिळाल्याने साराला आपला प्राण गमवावा लागला.
महत्वाची बाब म्हणजे याविषयी पेण उपरुग्णालयाच्या अधिक्षक डॉ. संध्या राजपूत यांना विचारणा केल्यानंतर त्यांनी सांगितले की, दवाखान्यात प्रथमोपचार केले. परंतु रुग्णांची तब्येत सुधारत नव्हती. पेणमध्ये आयसीयूची सुविधा नसल्याने आम्ही पुढे रुग्ण हलविण्यास सांगितले. यावरून एवढे निश्चित की, जर आयसीयूची सुविधा असती तर साराला वाचवता आले असते. या घटनेमुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली असून शहरातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.