विंडीजने दुसरा वनडे सामना जिंकला
| त्रिनिदाद | वृत्तसंस्था |
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात विंडीजने कसलेल्या भारतीय संघाला पराभवाची धूळ चारली. वेस्ट इंडीजने आधी भारतीय संघाला 181 धावात गारद केले. त्यानंतर हे आव्हान त्यांनी 36 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली. आता मालिकेचा निर्णय मंगळवारी होणाऱ्या तिसऱ्या वनडे सामन्यात होणार आहे. विशेष म्हणजे विंडीजने भारताविरूद्धचे आपले 10 पराभवांचे दुष्टचक्र तोडले.
वेस्ट इंडीजकरडून कर्णधार शे होपने विंडीजला आशेचे किरण दाखवले. पहिल्या वनडे सामन्यात एकाकी झुंज देणाऱ्या होपला आजच्या सामन्यात केसी कार्टेची अनमोल साथ लाभली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 91 धावांची नाबाद खेळी केली. शे होपने 80 चेंडूत नाबाद 63 धावा केल्या. तर कार्टेने 65 चेंडूत नाबाद 48 धावांचे योगदान दिले. भारताचे 182 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या विंडीजने दमदार सलामी दिली. सलामीवीर किंग आणि कायल मेयर्स यांनी 53 धावांची सलामी दिली. मात्र यानंतर शार्दुल ठाकूरने पाठोपाठ दोन बळी घेत विंडीजला अडचणीत आणले. ब्रँडन किंग 15 तर कायल मेयर्स 36 धावा करून एकाच षटकात बाद झाले. त्यानंतर आलेला अथनाजे देखील 6 धावांचेच योगदान देऊ शकला. त्याचीही शिकार शार्दुलनेच केली. 3 बाद 72 धावा अशी अवस्था झालेल्या विंडीजला सावरण्यासाठी स्टार खेळाडू शिमरॉन हेटमायर क्रीजवर आला होता. दुसऱ्या बाजूने कर्णधार शे होपने एक बाजू लावून धरली होती. या दोघांनी विंडीजला शतकाच्या जवळ पोहचवले होते. मात्र कुलदीप यादवच्या फिरकीने हेटमायरला चकवा दिला. 9 धावांवर खेळणाऱ्या हेटमायरचा कुलदीपने त्रिफळा उडवला. विंडीजची अवस्था 4 बाद 91 धावा अशी झाली होती. मात्र यानंतर आलेल्या केसी कार्टेने आपल्या कर्णधाराची साथ सोडली नाही. या दोघांनी नाबाद 91 धावांची भागीदारी रचत भारताला पराभवाच्या खाईत लोटले.
भारताची खराब कामगिरी
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या अनुपस्थितीत खेळत असताना भारताचा डाव हा 181 धावांत आटोपला. भारताची या सामन्यात बिनबाद 90 अशी दमदार सुरुवात झाली होती. त्यानंतर भारताचा संपूर्ण संघ 100 धावाही करू शकला नाही. इशान किशन आणि शुभमन गिल यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. इशानने सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावले खरे, पण पुन्हा एकदा तो शतक झळकावण्यात अपयशी ठरला. इशानने या सामन्यात सहा चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 55 धावांची खेळी साकारली. गिल यावेळी अर्धशतकाच्या जवळ आला तो, पण तो 34 धावांवर बाद झाला. हे दोन्ही सलामीवीर बाद झाले आणि त्यानंतर भारताचा डाव गडगडायला सुरुवात झाली. संजू सॅमसनला या सामन्यात संधी देण्यात आली होती. पण तो यावेळी फक्त 9 धावांवर बाद झाला. अक्षर पटेलला यावेळी चौथ्या स्थानावर बढती देण्यात आली होती. पण त्याला फक्त एकच धाव करता आली. त्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्या खेळायला आला. पण पंड्याला यावेळी सात धावाच करता आल्या. त्यानंतर काही काळ सूर्यकुमार यादवने चांगली फलंदाजी केली खरी, पण तो 24 धावांवर बाद झाला. रवींद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूर या दोन्ही अष्टपैलू खेळाडूंनी काही काळ फलंदाजी केली खरी. पण जडेजा यावेळी 10 धावा करू शकला, तर शार्दुलने 16 धावा केल्या. ही भारतासाठी अखेरची आशा होती. कारण त्यानंतर एकाही भारतीय फलंदाजाला दोन अंकी धावसंख्या उभारता आली नाही. यावेळी भारताला 11 अवांतर धावा आंदण मिळाल्या आणि त्यामुळे त्यांचा डाव 181 धावांवर सर्व बाद झाला.
खेळपट्टी चांगली होती. पण आमच्या फलंदाजांनी खराब फटके मारुन पटकन बाद झाले. शार्दुलने शानदार गोलंदाजी केली आणि त्याने आमच्या आशा जिवंत ठेवल्या. निराश झालो, पण बरेच काही शिकायला मिळाले. किशनने ज्या पद्धतीने फलंदाजी केली, ते भारतीय क्रिकेटसाठी महत्त्वाचे आहे.
हार्दिक पांड्या, कर्णधार
ससा नव्हे कासव आहोत
एकदिवसीय विश्वचषकाच्या तयारीबाबत बोलताना हार्दिक पांड्या म्हणाला, मी वनडे विश्वचषकाची तयारी करत आहे, त्यामुळे आणखी काही षटके करत आहे. हळूहळू मी पूर्ण बॉलिंग फिटनेसकडे वाटचाल करत आहे. यावेळी मी ससा नसून कासव झालो आहे. मालिका 1-1अशी बरोबरीत राहिली असून आता शेवटचा सामना निर्णायक ठरणार आहे. पुढचा सामना चाहत्यांसाठी तसेच खेळाडूंसाठी रोमांचक असेल, असा दावाही त्याने केला.