5-0ने केला पराभव; गुणतालिकेत पहिल्या स्थानावर झेप
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
यजमान भारतीय पुरुष हॉकी संघाने रविवारी मलेशियाचा 5-0 असा धुव्वा उडवला. भारताने या विजयासह आशियाई चॅम्पियन्स हॉकी करंडकात सात गुणांसह पहिल्या स्थानावर धडक मारली. कार्ती सेल्वम, हार्दिक सिंग, हरमनप्रीत सिंग, गुर्जंत सिंग व जुगराज सिंग यांनी प्रत्येकी एक गोल करीत भारताला दिमाखदार विजय मिळवून दिला. मलेशियाचा संघ सहा गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
सेल्वम याने 15 व्या मिनिटाला फिल्ड गोल करीत भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 32 व्या मिनिटाला हार्दिक सिंगने पेनल्टी कॉर्नरवर दमदार गोल केला. हरमनप्रीत सिंगने 42 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर भारताचा तिसरा गोल केला. गुर्जंत सिंगने 53 व्या मिनिटाला फिल्ड गोल करीत भारताच्या गोलचा चौकार मारला. 54 व्या मिनिटाला जुगराज सिंगने पेनल्टी कॉर्नरवर गोल करीत भारताच्या दणदणीत विजयावर शिक्कामोर्तब केले.
पाकिस्तान-जपान यांच्यामध्ये रविवारी झालेली अन्य लढत 3-3 अशी बरोबरीत राहिली. यामुळे या दोन्ही देशांना या स्पर्धेमध्ये अद्याप विजयाचे खाते उघडता आलेले नाही. त्यामुळे पाकिस्तान व जपान या दोन्ही देशांना प्रत्येकी तीन लढतींनंतर दोन गुणांवरच समाधान मानावे लागले आहे. या दोन्ही देशांच्या दोन लढती अनिर्णित राहिल्या असून एका लढतीत त्यांचा संघ पराभूत झाला आहे. पाकिस्तानकडून राणा अब्दुल, मुहम्मद खान यांनी दमदार गोल केले. जपानकडून सेरेन तनाका, आरयोसेई कातो व मसाकी ओहाशी यांनी शानदार गोल केले.
चीन-दक्षिण कोरिया बरोबरीत
दक्षिण कोरिया-चीन यांच्यामध्येही रविवारी लढत पार पडली. या लढतीत गतविजेत्या दक्षिण कोरियाला रोखण्यात चीनला यश मिळाले. चीनने दक्षिण कोरियाला 1-1 अशा बरोबरीत रोखले. जांग जोंगह्यून याने 18 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर दक्षिण कोरियासाठी गोल केला. पण चीनच्या चेन चोंगकोंग याने अप्रतिम फिल्ड गोल करून बरोबरी साधली. अखेरच्या क्वॉर्टरमध्ये दोन्ही देशांना गोल करता आला नाही. दक्षिण कोरियाने तीन सामन्यांमधून पाच गुणांची कमाई केली असून, चीनला तीन सामन्यांमधून फक्त एका गुणाचीच कमाई करता आली आहे.