सुधागडात पोलीस निरीक्षकांना निवेदन
| पाली/बेणसे | वार्ताहर |
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील नाभिक समाजाच्या नीलिमा सुधाकर चव्हाण हीचा मृतदेह ज्या अवस्थेत मिळाला ते पाहता तिचा घातपातच झाला असल्याचा दाट संशय तिच्या नातेवाईकांनी व्यक्त केला. या घटनेनंतर रायगडात नाभिक समाज आक्रमक झालाय, राज्यभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत. आरोपींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी सुधागड तालुका नाभिक समाजसेवा संघ यांनी पाली सुधागड तहसीलदार उत्तम कुंभार व पाली पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण यांना दिले.

नाभिक समाजाच्या भगिनीचा घातपाताच्या दृष्टीने 12 ऑगस्ट पर्यंत पोलिसांनी कसून चौकशी करून आरोपींचा तपास घ्यावा व सुधाकर चव्हाण व त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा अन्यथा आम्ही सर्व रायगड जिल्हा नाभिक तरुण संघ, समाज बांधव संपूर्ण ताकदीनिशी 15 ऑगस्ट रोजी रत्नागिरी येथील पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक मोर्चा काढू तसेच रायगड, रत्नागिरीसह संपूर्ण महाराष्ट्रातील सलून व्यवसाय बंद ठेवून आंदोलन छेडण्यात येईल व याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशारा देण्यात आला. यावेळी सुधागड तालुका नाभिक समाज अध्यक्ष रुपेश पवार, दीपक शिंदे, दिनेश पवार, अमित गुजर, गंगाधर पांडव, रुपाली पांडव, दर्शना शिंदे, समिधा गुजर, नैत्रा पवार, सानिका गुजर, उज्वला गुजर, संध्या गुजर, अश्विनी शिंदे, सोनाली पवार तसेच समाजबांधव उपस्थित होते.
नाभिक समाजाचे तहसीलदार यांना निवेदन
| कोर्लई | वार्ताहर |
नाभिक समाजाची ओमळी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी येथील निलीमा सुधाकर चव्हाण ही अतिशय गरीब कुटुंबातील मुलगी. दापोली येथील भारतीय स्टेट बँकेत नोकरीस होती. शनिवार दि.29 जुलै रोजी बँकेची सुट्टी झाले नंतर घरी येत असतांना ती अचानक बेपत्ता झाली. त्यानंतर तिचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत जवळच्या खाडीत मंगळवार दि. 01 ऑगस्ट रोजी सापडलेला आहे. तिच्या संशयास्पद मृत्युची पोलीस प्रशासनाने व महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने तातडीने सखोल चौकशी करून तपास लावावा, तसेच असे अमानुष व अमानवी कृत्य करणाऱ्या संशयितांचा तपास होऊन कठोर शासन करावे, अशी मागणी नाभिक समाजातर्फे मुरुड तालुका अध्यक्ष प्रकाश चव्हाण, विश्वास चव्हाण व महिला तालुका अध्यक्ष वृषाली चव्हाण यांनी समाज बांधवांच्या वतीने तहसीलदार रोहन शिंदे यांना निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी प्रभाकर कोलवणकर, राज पवार, राजू पवार, उदय आयरकर, जगदीश आयरकर, राजेश गायकवाड, प्रवीण रावकर, प्राजक्ता चव्हाण, श्रद्धा गायकवाड यांसह समाज बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.