गळाला लागली 10 फूट लांबीची किळशी मासळी

| उरण | वार्ताहर |

तालुक्यातील मोरा धक्क्यावर गळ टाकून मासेमारी करणाऱ्या मासेमाराच्या गळाला किळशी नावाची मासळी लागली आहे. ती 10 फूट लांबीची आहे. समुद्र किनारी एवढी मोठी किळशी सापडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मोरा धक्क्यावर गळ टाकून मासेमारी करण्याचा छंद अनेकांना आहे. असाच एक तरुण मासेमारी करत असताना तरुणाच्या गळाला किळशी मासळी लागली. बाजारात या मासळीची किंमत सुमारे एक हजार रुपये आहे.

किळशी मासळी हि रेवस, बोडणी, मांडवा, नवगाव या ठिकाणच्या समुद्रात सापडते. तसेच या ठिकाणी ती खाल्ली जात असली तरी विशेष करुन ती खारेपाटात चवीने खाल्ली जाते. किळशी मासळी ही औषधी आहे. कंबरदुखी, संधीवात या आजारावर ती गुणकारी असते. त्यामुळे तीचा औषधी म्हणून वापर केला जातो, असे मांडवा येथील मच्छिमार अनिल भिंगारकर यांनी कृषीवलीशी बोलताना सांगितले.

10 ते 15 फुटापर्यंत या मासळीची लांबी आढळून येते. या मासळीला काटे अधिक प्रमाणात असल्याने कमी लोक खातात. मात्र, माहितगार असणाऱ्यांमध्ये या मासळीला मागणी असते. बाजारात तुकडीच्या स्वरुपात देखील विक्रीसाठी उपलब्ध असते. जिवंत किळशी मासळी चावल्यास मोठी जखम होण्याची शक्यता असते.

Exit mobile version