| उरण | वार्ताहर |
उरण येथे 100 खाटांचे श्रेणीवर्धीत उपजिल्हा रुग्णालय तसेच, अधिकारी व कर्मचार्यांसाठी निवासस्थान इमारत बांधण्यात येणार आहे. त्यामुळे गेल्या 15हून अधिक वर्षे प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागणार आहे. या कामासाठी 82 कोटी 54 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. नुकतेच मांडलेल्या राज्याच्या अर्थ संकल्पात या निधीची तरतूद केली नसल्यामुळे जून महिन्यापर्यंत निधी मिळण्यासाठी वाट पहावी लागणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेल्या या उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधकामाला जूननंतरच मुहूर्त मिळणार आहे.
उद्योग, वाहतूक आणि लोकसंख्येचा विचार करता दिवसेंदिवस उरण परिसराचा झपाट्याने विकास होत आहे. त्यामुळे येथे आरोग्य सुविधांची गरज निर्माण झाली आहे. उरणमध्ये सर्व सुविधांयुक्त शासकीय उपजिल्हा रुग्णालय आणि त्या अनुषंगाने सुविधा देण्याची मागणी करण्यात आली होती. सिडकोच्या माध्यमातून उरण-पनवेल मार्गावरील वायू विद्युत केंद्राच्या कामगार वसाहतीशेजारी भूखंड मंजूर करून देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे प्रथम 5 कोटी त्यानंतर 57 कोटी रुपयांचा निधीही मंजूर झाला होता. मात्र, मागील अनेक वर्षांपासून हे रुग्णालय कोणत्या न कोणत्या कारणामुळे रखडलेले आहे. रुग्णालयासाठी सिडकोने दिलेला हा भूखंड सीआरझेडमध्ये येत असल्याने या रुग्णालयाचा आराखडा बदलण्यात आला आहे. अगोदरच्या आराखड्यात भूखंडावर रुग्णालय आणि कर्मचार्यासाठी निवासी संकुले बांधण्यात येणार होती; मात्र हा भूखंड सीआरझेडच्या कचाट्यात अडकल्यामुळे येथे फक्त रुग्णालयासाठीच जागा उरत होती. त्यामुळे हा आराखडा बदलण्यात आला आणि नवीन आराखडा बनवला आहे. या आराखड्यानुसार मंजूर भूखंडावर फक्त रुग्णालय उभारले जाणार आहे आणि कर्मचार्यांसाठी निवासी संकुले बांधण्यासाठी उरण येथील इंदिरा गांधी रुग्णालयाच्या जवळचा भूखंड निश्चित केला आहे. रुग्णालयाकरिता सिडकोच्या माध्यमातून उरण-पनवेल मार्गावरील वायू विद्युत केंद्राच्या कामगारवसाहती शेजारी भूखंड देण्यात आला आहे.
उरणमध्ये लवकरच 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय
