| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुक्यात खुलेआम खारफुटीच्या जंगलाची कत्तल करून व्यवसायिकांना खासगी गोदाम उभारणीसाठी शासकीय प्रशासन परवानगी देत आहे. मात्र, सिडकोच्या बोकडविरा परिसरात मंजूर झालेल्या भूखंडावरील 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारण्यासाठी शासकीय प्रशासन परवानगी देत नसल्याची माहिती समोर येत असल्याने जनसामान्यांत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून उरणकरांना सुसज्ज उपजिल्हा रुग्णालयाची प्रतीक्षा आहे. मात्र, किनारा नियमन (सीआरझेड)ची परवानगी न मिळाल्याने हे रुग्णालय रखडले आहे. त्यामुळे येथील रुग्णांना पनवेल किंवा नवी मुंबईत जाऊन उपचार घ्यावे लागत आहे. तर, दुसरीकडे तालुक्यात शासकीय किंवा खासगी अतिदक्षता विभाग असलेले रुग्णालय उपलब्ध नसल्याने रुग्णांना रस्त्यातच आपले जीव गमवावे लागत आहे. त्यामुळे उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून येथील अपघात आणि रुग्णांचे होणारे हाल या विरोधात आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर 2010 मध्ये शासनाने उरणमध्ये 100 खाटांचे रुग्णालय उभारण्याला प्रशासकीय मंजुरी दिली होती. त्यासाठी सिडकोच्या बोकडविरा परिसरात भूखंड मंजूर करण्यात आला असून, सुमारे 58 कोटींचा निधी देखील मंजूर करण्यात आला होता. मात्र, हा भूखंड सीआरझेडध्ये मोडत असल्याने शासनाच्या नाकर्तेपणामुळे आज उरणकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण असलेले उपजिल्हा रुग्णालय कांदळवनाच्या कचाट्यात अडकून पडले आहे, असे जनसामान्यांमधून बोलले जात आहे.
एकंदरीत खासगी व्यवसायिकांना गोदाम उभारणीसाठी शासकीय प्रशासन खुलेआम खारफुटीच्या जंगलाची कत्तल करण्यासाठी परवानगी देत आहे. मात्र, उरणकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण असलेल्या सेवेपैकी सुसज्ज उपजिल्हा रुग्णालय उभारण्यासाठी सिडकोच्या बोकडविरा परिसरातील मंजूर भूखंडावर सीआरझेडचे कारण पुढे करत शासकीय प्रशासन परवानगी देत नसेल तर ती शोकांतिका आहे, अशी प्रतिक्रिया जनमानसात उमटू लागली आहे.
उरण तालुक्याचे औद्योगिकरण व नागरिकरण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय व कोप्रोलीतील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णालयावर त्याचा ताण पडत आहे. त्यामुळे अत्याधुनिक सुविधा युक्त सुसज्ज उपजिल्हा रुग्णालय उभारण्यासाठी सिडकोच्या बोकडविरा परिसरात भूखंड मंजूर करण्यात आला आहे. तसेच, 100 खाटांच्या रुग्णालयासाठी सुमारे 58 कोटीचा निधी देखील मंजूर करण्यात आला आहे. परंतु, मंजूर झालेल्या भूखंडावर खारफुटी असल्याने परवानगी अभावी या रुग्णालयाचे काम रखडले आहे.
डॉ. राजेंद्र इटकरे,
अधिकारी, उरण तालुका आरोग्य विभाग







