13 वर्षांच्या मुलीच्या फुफ्फुसातून काढली 2.1 इंचाची पिन

। पनवेल । वार्ताहर ।

चुकून पिन गिळल्याने एका 13 वर्षीय मुलीच्या फुफ्फुसात ही 2.1 इंचाची पिन अडकली असून खारघरच्या मेडिकवर हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी ती यशस्वी बाहेर काढली आहे. मेडिकवर हॉस्पिटलमधील फुफ्फुस विकार तज्ज्ञ डॉ. शाहिद पटेल यांच्या नेतृत्वाखाली टिमने ब्रॉन्कोस्कोपीद्वारे या मुलीच्या फुफ्फुसातील पिन यशस्वीपणे बाहेर काढली.

महाराष्ट्रातील राजापूर येथील कृती कुमार (नाव बदलले आहे), या शाळकरी मुलीने ओढणी घालताना चुकून पिन गिळली. यावेळी तिला तातडीने कोकण जिल्ह्यातील रत्नागिरी येथील एक रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे मुलीवर ओजीडोस्कोपी करण्यात आली. जेणेकरून ही पिन पोटात आहे की नाही हे पाहता येईल. वैद्यकीय तपासणीनंतर मुलीच्या फुफ्फुसात पिन अडकल्याचे निष्पन्न झाले. पण यामुळे या रुग्णाला कोणताही त्रास होत नव्हता. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी तिला खारघरच्या मेडिकवर हॉस्पीटलमध्ये पुढील उपचाराकरिता दाखल करण्यात आले. यावेळी प्रसंगावधान राखत डॉक्टरांच्या टीमने तातडीने ब्रॉन्कोस्कोपी करत फुफ्फुसात अडकलेली ही पिन बाहेर काढली. याबाबत डॉ. शाहिद पटेल (फुफ्फुसविकार तज्ज्ञ, मेडिकवर हॉस्पिटल, नवी मुंबई) सांगतात की, या मुलीला आपत्कालीन स्थितीत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय तपासणीत डाव्या फुफ्फुसाच्या खालच्या भागात पिन अडकल्याचे दिसून आले. यावेळी तिला ताबडतोब आपत्कालीन उपचार देण्यात आले. फुफ्फुसात अडकलेली ही पिन काढणे हे एक आव्हानात्मक होते. कारण मुलगी किशोरवयीन असून तिची श्‍वासनलिका लहान होती. तसेच ही पिन डाव्या फुफ्फुसाच्या खालच्या भागात अडकली असून ती अणकुचीदार होती. ही प्रक्रिया जवळपास 50 मिनिटे चालली. मुलीचे वडील किरण कुमार (नाव बदलले आहे) सांगतात की, आमच्या मुलीने चुकून पिन गिळली तेव्हा आम्ही सर्वच घाबरलो होतो. पण मेडिकवर हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी तात्काळ उपचार करत मुलीच्या फुफ्फुसातील पिन यशस्वीरित्या बाहेर काढली. तिचे फुफ्फुस आणि अन्य अवयवांना इजा न पोहोचविता ही प्रक्रिया पार पाडल्याने आम्ही डॉक्टरांचे विशेष आभार मानतो. मेडिकवर हॉस्पिटलचे केंद्र प्रमुख डॉ. माताप्रसाद गुप्ता सांगतात की, अत्याधुनिक इमेजिंग तंत्रज्ञान आणि तज्ञ, प्रगत एंडोस्कोपिक उपचारांमुळे रुग्णाचे प्राण वाचविता आले. संपुर्ण राज्यातील विविध प्रकारच्या रुग्णांवर याठिकाणी यशस्वी उपचार केले जात असून मेडिकवर हॉस्पीटल हे रुग्णांकरिता आशेचा किरण ठरत आहे.

Exit mobile version