नऊ आदिवासी वाड्यांचा एक बाप्पा

आदिवासी लोकांचे सामाजिक ऐक्य

। नेरळ । प्रतिनिधी ।

प्रत्येक समाजात आणि प्रत्येक गावात दोन गटात भांडणे खूप असतात आणि त्यात राजकारण आल्यानंतर प्रत्येक आदिवासी वाडीमध्ये दोन गट निर्माण झाले आहेत. त्याला आदिवासी समाजदेखील अपवाद नाही. पण, विद्येचा दाता आणि सृष्टीचा निर्माता असलेल्या गणराय एक छत्रात असावे अशी संकल्पना कर्जत तालुक्यातील एक-दोन नाहीतर तब्बल नऊ आदिवासी वाड्यांनी मांडली आणि एकत्र येऊन सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करीत आहेत.

बेडीसगाव मधील नऊ आदिवासी वाड्या यांनी मिळवून एक गाव एक गणपती अशी नाही तर ’नऊ आदिवासी वाड्या आणि एक गणपती ’ अशी संकल्पना उदयास आणली. त्याचा परिणाम शेलु ग्रामपंचायत मधील बेडीसगाव येथील शाळेची वाडी मधील सार्वजनिक समाज मंदिरात गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. तेथील शाळेचीवाडी, कुंदवाडी,आंबेवाडी, कोथाचीवाडी, बोरीचीवाडी, गावठाण वाडी, वाघिणीचे वाडी यांनी एकत्रित मिळून हा उत्सव सुरू केला आहे.

एक गाव एक गणपती अशी संकल्पना सर्वत्र रूढ आहे. मात्र साधारण 500 कुटुंबांनी एकत्र येवून एक गणपती आणण्याचे असे महाराष्ट्र राज्यातील एकमेव उदाहरण असेल. त्यात नऊ आदिवासी वाड्या एकत्र येवून आरती म्हणणे, दररोज जागर भजन सादर करणे, त्याशिवाय एकत्र येवून प्रसाद बनविणे ही कामे हे सर्व आदिवासी एकत्र करताना दिसतात. तर दररोज रात्री महिलांचे आदिवासी नृत्य, पुरुषांचे बाल्या डान्स, ढोलकी नाच तसेच भारुड असे कार्यक्रम यांची सलग दहा दिवस रेलचेल असते.गेली 18वर्षे ही परंपरा टिकवून ठेवण्याचे मोठे कष्ट माजी उपसरपंच मंगळ दरवडा यांच्याकडून सुरू आहे.

बेडीसगाव मध्ये नऊ आदिवासी वाड्या यांनी एकत्र येवून गणेश उत्सव आणि त्यात तेथे सर्व ग्रामस्थ गुण्यागोविंदने साजरा करीत आहेत. मागील काही महिने रस्त्याच्या प्रश्‍नावरून स्थानिकात वाद होते,परंतु गणेश उत्सव काळात पोलिसांना तेथे कोणतेही काम लागत नाही यातच बाप्पाची किमया असल्याचे दिसून येते. आम्ही ही अनेक वाड्या एकत्र येवून गणेश उत्सव साजरा करण्याची संकल्पना जिल्हा पोलीस यांच्यापुढे मांडणार आहोत.

राजेंद्र तेंडुलकर, पोलीस निरीक्षक, नेरळ
Exit mobile version