| उरण | वार्ताहर |
उरणचा औद्योगिक विकास झपाट्याने होत आहे. यामुळे दळणवळणासाठी अनेक रस्ते व उड्डाणपूलाची निर्मिती होत आहे. त्यांना येथील थोर व्यक्तींची नांवे देण्यात यावी, अशी मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने मुख्यमंत्री व जेएनपीए प्रशासनाकडे केली आहे.
उरण येथील करंजा येथून अलिबागला जोडण्यासाठी करंजा रेवस पुलाची उभारणी करण्याचे स्वप्न कोकणचे माजी केंद्रीय मंत्री व मुख्यमंत्री बॅरिस्टर ए.आर. अंतुले यांचे होते. त्यांची स्वप्नपूर्ती लवकरच होणार असल्याने या करंजा-रेवस पुलाला बॅरिस्टर ए.आर. अंतुले यांचे नाव देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्याच बरोबर जेएनपीए बंदराच्यावतीने उरण ते पनवेल आणि उरण ते आम्रमार्ग या रस्त्यांचे आधुनिकीकरण करून सर्वोत्तम रस्ते तयार करण्यात आले आहेत. अतिशय नियोजनबद्ध आणि नीट नेटक्या रस्त्यांना अनेक ठिकाणी उड्डाणपूल बांधण्यात आलेले आहेत. मात्र, या उड्डाण पुलांना स्थानिक मान्यवर व्यक्तिमत्वांची नावे दिल्यास ते अतिशय समर्पक होईल. तसेच, या भागातील ज्या महनीय व्यक्तींनी येथील विकासाला चालना दिलेली आहे त्यांचे नावाचे एक प्रकारे उचित स्मारक देखील होऊन जाईल. याच पार्श्वभूमीवर उरण पनवेल मार्गावरील नवघर येथील उड्डाण पुलाला तु. ह. वाजेकर यांचे तर गव्हाण फाटा उड्डाण पुलाला जनार्दन भगत यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाच्यावतीने जेएनपीए च्या अध्यक्षांना दिलेल्या लेखी निवेदनातून करण्यात आली आहे .