28 मे रोजी मुंबई-गोवा महामार्गावर आंदोलनाचा इशारा
| पेण | प्रतिनिधी |
गेल इंडिया कंपनीच्या गॅस पाईपलाईन प्रकल्पाविरोधातील आंदोलनाला आता अधिक आक्रमक वळण मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. 24 गाव संघर्ष समितीच्या वतीने पेण येथील महात्मा गांधी वाचनालयात आयोजित बैठकीत आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. सीआरझेड परवानगीसह विविध मुद्द्यांवर कायदेशीर लढाईसोबतच रस्त्यावर उतरून जनआंदोलन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. याच पार्श्वभूमीवर 28 मे रोजी मुंबई-गोवा महामार्गावर धरणे आंदोलन करण्याची घोषणाही करण्यात आली.
दरम्यान, गेल कंपनीची गॅस पाईपलाईन उरण, पनवेल, पेण आणि अलिबाग या चार तालुक्यांतून जात असून, अनेक शेतकऱ्यांनी मोबदला स्वीकारल्याची माहिती बैठकीत समोर आली. उरण तालुक्यातील बहुतांश काम पूर्ण झाली असून, अलिबागमध्ये सुमारे 80 टक्के काम पूर्णत्वाकडे गेले आहे. पेण तालुक्यातील 13 गावांमध्येही पाईपलाईनचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याने आंदोलनाची ताकद आणि पुढील दिशा यावरच प्रश्न निर्माण झाले आहेत. या बैठकीला 24 गाव संघर्ष समितीचे अध्यक्ष काशिनाथ पाटील, अशोक मोकल, नंदा म्हात्रे, राजन झेमसे, हर्षल पितळे यांच्यासह अनेक शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.







