। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
खेड तालुक्यातील भरणे नाका येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने एका कारमध्ये 22 किलोचा सुमारे 4 लाख 41 हजारांचा गांजा जप्त केला. याप्रकरणी मंडणगडमधील तिघांना अटक करण्यात आली आहे.
सोमवारी (दि. 26) स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलिस पथक चिपळूण व खेड उपविभागात रात्रीची गस्त घालत होते. त्याचवेळी भरणे नाका येथे एक कार उभी असल्याचे दिसून आले. कारमध्ये चालकासह असणार्या अन्य दोन व्यक्तींच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिस पथकाने चौकशी केली. मात्र, चालक आणि इतर दोघांनी समर्पक उत्तरे दिली नसल्याने पोलिसांनी कारची तपासणी केली असता बॅगमध्ये गांजा सदृश्य अंमली पदार्थ असल्याचे स्पष्ट झाले.
या कारवाईत 4 लाख 41 हजार 180 रुपये किमतीचा 22.059 कि. ग्रॅम वजनाचा गांजा, 6 लाख किमतीची चारचाकी गाडी असा एकूण 10 लाख 41 हजार 380 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. तसेच, याप्रकरणी पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली असून अधिक तपास खेड पोलिस करीत आहेत.