| पनवेल | प्रतिनिधी ।
धार्मिक स्थळांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पनवेलच्या लाईन आळी परिसरातील एका जुन्या आणि जागृत शिवमंदिरात चोरीचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्याला नागरिकांनी रंगेहात पकडल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नेहमीच्या वर्दळीच्या वेळी एका अनोळखी व्यक्तीने मंदिराच्या गर्दीचा गैरफायदा घेत गाभाऱ्यात प्रवेश केला. नंदीच्या मूर्तीजवळ आणि दानपेटीत भाविकांनी अर्पण केलेले पैसे चोरण्याचा प्रयत्न त्याने केला. मात्र, हे कृत्य करत असतानाच सजग भाविकांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी तातडीने चोराला पकडून त्याच्या हालचालींवर नियंत्रण मिळवले. पवित्र स्थळी अशा प्रकारचे कृत्य घडल्याने उपस्थित नागरिकांमध्ये संतापाची भावना दिसून येत होती. देवाच्या दारात चोरीचे धाडस करणाऱ्या या चोरट्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाविकांनी केली आहे.







