। महाड । प्रतिनिधी ।
महाड एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीमध्ये गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत असून यामध्ये खून, खुनाचा प्रयत्न, बेदम मारहाण, विनयभंग, महिलांवर अत्याचार, चोरी अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. मागील काही दिवसांपासून विद्यमान सरपंचांवर हल्ले होत असून, महाड आणि पोलादपूर तालुक्यातील सरपंचांना मारहाण झाल्याची घटना ताजी असतानाच आज महाड तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत सवाने येथील विद्यमान सरपंचाला काठीने बेदम मारहाण झाल्याची घटना नुकतीच घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. 18) मुलांच्या क्रिकेट खेळण्याच्या वादातून जाब विचारण्यासाठी गेलेल्या विद्यमान सरपंचाला शिवीगाळ करीत घरात घुसून काठीने बेदम मारहाण करण्यात आली. तसेच अश्लील शिवीगाळ करीत तुला बघून घेतो अशी धमकी देण्यात आली आहे. सरपंच यशवंत पवार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना महाड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची पत्नी योजना पवार यांनी याबाबत महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अरुण मुकणे, गणपत मुकणे, संदीप मुकणे, गणेश पवार सर्व राहणार खैराट आदिवासी वाडी अशी चारही आरोपींची नावे असून या सर्व आरोपींनविरोधात महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रभारी पोलीस अधिकारी विजय सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुंडे या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.






