अधिकाऱ्यांची उत्तर देताना दमछाक; जलजीवन मिशनसह अनेक मुद्दे ऐरणीवर
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
सुधागड तालुक्यातील विकासकामे, प्रलंबित प्रश्न आणि नागरिकांच्या विविध अडीअडचणींचा आढावा घेण्यासाठी पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत तक्रारींचा अक्षरशः पाऊस पडला. अनेक प्रश्नांवर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने बैठकीत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, आमदार अनिकेत तटकरे यांनी बैठक सकारात्मक पद्धतीने हाताळत अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना व निर्देश दिले.
पंचायत समितीच्या कै नामदेवशेट खैरे सभागृहात संपन्न झालेल्या या बैठकीस माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन, पंचायत समिती सभापती जागृती मानकर, उपसभापती संदेश शेवाळे, गटविकास अधिकारी लता मोहिते, रोहा उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, तहसीलदार उत्तम कुंभार, पाली नगराध्यक्ष पराग मेहता, उपनगराध्यक्ष सुलतान बेनसेकर, नगरसेवक, विविध विभागांचे अधिकारी तसेच तालुक्यातील ग्रामस्थ उपस्थित होते.
खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार होती. मात्र, काही अपरिहार्य कारणामुळे ते प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत. त्याबद्दल आमदार अनिकेत तटकरे यांनी बैठकीच्या सुरुवातीलाच दिलगिरी व्यक्त केली. त्यानंतर खासदार सुनील तटकरे यांनी दूरध्वनीद्वारे बैठकीतील विविध विषयांना स्पर्श करत नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आमदार अनिकेत तटकरे यांच्या नेतृत्वाखाली बैठकीस सुरुवात झाली.
बैठकीत सर्वाधिक चर्चेचा विषय जलजीवन मिशनचा ठरला. संबंधित अधिकाऱ्यांनी तालुक्यातील 29 गावांमधील जलजीवन मिशनच्या योजना पूर्ण झाल्याचे सांगत संबंधित गावांची नावे वाचून दाखविली. मात्र, उपस्थित ग्रामस्थांनी यावर तीव्र आक्षेप घेत अनेक योजना प्रत्यक्षात अपूर्ण असल्याचा आरोप केला.गावांमध्ये पाण्याच्या टाक्या उभारलेल्या नाहीत, टाक्यांपर्यंत अथवा घरांपर्यंत टाकण्यात आलेल्या पाईपलाईन फुटलेल्या आहेत, तर अनेक ठिकाणी अद्याप एक थेंबही जलजीवन मिशनचे पाणी घरापर्यंत पोहोचलेले नाही, अशी वस्तुस्थिती ग्रामस्थांनी मांडली. योजनांची कामे पूर्ण झाल्याचे अधिकारी सांगत असताना प्रत्यक्ष परिस्थिती मात्र वेगळी असल्याने बैठकीत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.यावर आमदार अनिकेत तटकरे यांनी 29 गावांची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे निर्देश दिले. पंचायत समिती सभापती, उपसभापती आणि संबंधित अधिकाऱ्यांनी या गावांना भेट देऊन वस्तुस्थितीचा अहवाल सादर करावा. तसेच पुढील सोमवारी अधिकारी आणि ग्रामस्थांची पुन्हा बैठक घेऊन या प्रश्नावर निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
पंचायत समितीच्या बैठकीला संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित राहत नसल्याने नागरिकांच्या तक्रारींवर योग्य उत्तर देता येत नसल्याची नाराजी सभापती जागृती मानकर यांनी व्यक्त केली. यावर आ.अनिकेत तटकरे यांनी तहसीलदार उत्तम कुंभार यांना सूचना देत, तहसीलदार हे न्याय दंडाधिकारी असल्याने संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीस उपस्थित राहण्याचे स्पष्ट निर्देश द्यावेत, असे सांगितले. अधिकारी बैठकीस उपस्थित राहिले नाहीत तर सभापतींनी त्यांच्या अधिकारात संबंधित अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करावा आणि त्याची प्रत जिल्हा परिषदेकडे पाठवावी. अशा प्रकारे गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
