| पनवेल । वार्ताहर ।
खारघर सेक्टर 12 मधील घरकुलकडून शिवमंदिरकडे जाणार्या मेट्रो पुलाखालील रस्त्यावर कडेला काही फासेपारधी झोपड्या बांधून अनेक दिवसांपासून वास्तव्य करीत आहेत; या अतिक्रमणाकडे पालिका आणि वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असून, रस्ता ओलांडताना अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. काहींनी थेट रस्त्याच्या दुभाजकावरच झोपडी उभारून कुटुंबासह बस्तान मांडले आहे. या रस्त्यावर नेहमी वाहनांची वर्दळ असते. तसेच झोपडीत राहणारी मुले रस्त्यावरच खेळत असल्याने रस्ता ओलांडताना अपघाताची शक्यता आहे. दिवसभरात या रस्त्यावरून पालिका, सिडको आणि वाहतूक पोलिसांचा राबता असतो; मात्र असे असतानाही दुभाजकावरील झोपड्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याविषयी खारघर पालिकेचे प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी कारवाई केली जाईल, असे सांगितले.