सनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा धक्का!

कोच डेल स्टेनची आगामी हंगामातून माघार

। मुंबई । वृत्तसंस्था ।

आयपीएलचा 18 वा हंगाम 2025 मध्ये खेळला जाणार आहे. या आगामी हंगामासाठी सर्व फ्रँचायझी त्यांच्या खेळाडूंबाबत रणनीती आखत असताना, काही संघांनी त्यांच्या कोचिंग स्टाफमध्ये बदलही केले आहेत. दरम्यान, आयपीएल 2025 पूर्वी सनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा धक्का बसला आहे. या संघासाठी वेगवान गोलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका बजावणार्‍या डेल स्टेनने एक मोठा निर्णय घेत संघातून बाहेर पडण्याची घोषणा करून सर्वांना आश्‍चर्य चकीत केले आहे.
डेल स्टेनने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या एका पोस्टद्वारे ही माहिती दिली. ज्यामध्ये त्याने स्पष्टपणे लिहिले की, तो आयपीएल 2025 साठी येणार नाही. सनरायझर्स हैदराबाद संघाने डेल स्टेनची डिसेंबर 2021 मध्ये वेगवान गोलंदाज प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली होती. त्यानंतर त्याने सलग तीन हंगाम ही जबाबदारी सांभाळली आहे. गेल्या आयपीएल हंगामात डेल स्टेनने हैदराबाद संघाचा नवा कर्णधार पॅट कमिन्ससोबत काम केले. ज्यामध्ये संघ अंतिम फेरीत पोहोचण्यात यशस्वी ठरला होता. डेल स्टेनने एक्सवर पोस्ट करताना लिहिले, मला आयपीएलमध्ये गोलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारण्याची संधी दिल्याबद्दल मी सनरायझर्स हैदराबाद संघाचे खूप आभार मानू इच्छितो. पण मी आयपीएल 2025 साठी परत येणार नाही. कारण, मी दक्षिण आफ्रिकेतील एसए टी-20 मध्ये सनरायझर्स इस्टर्न केपसोबत काम करणे सुरु ठेवणार आहे. एसए टी-20 मध्ये दोनदा जेतेपद जिंकणार्‍या सनरायझर्स इस्टर्न केप सलग तिसर्‍यांदा ट्रॉफी जिंकवण्याचा प्रयत्न करणार आहे.

सनरायझर्स हैदराबाद संघाने 2024 मध्ये खेळल्या गेलेल्या आयपीएल हंगामापूर्वी आपल्या कोचिंग स्टाफमध्ये अनेक मोठे बदल केले होते. ज्यामध्ये डॅनियल व्हिटोरीला नवीन मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले होते. त्याचबरोबर डेल स्टेनला गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून कायम ठेवले होते.

Exit mobile version