महामार्गावर पडला भला मोठा खड्डा

। कोलाड । वार्ताहर ।

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आंबेवाडी नाक्यावरील मुख्य बाजारपेठेतील चौकात रस्त्याला भला मोठा खड्डा पडला असून यामुळे वाहनचालकांसह प्रवासी वर्गाच्या जीवाला धोका निर्माण झाला असून यावर उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

मुंबई-गोवा हायवेवरील आंबेवाडी नाक्यावरील निकृष्ट दर्जाच्या कामामुळे आंबेवाडी ग्रामपंचायतीतर्फे ठेकेदारासहित तहसीलदार यांना निवेदन दिले. विविध क्षेत्रातील नागरिकांनी रास्ता रोको केला. कोलाड पोलीस ठाण्यात निवेदन दिले. कोलाड पोलिसांनी तातडीने ठेकेदाराच्या इंजिनियरला घेऊन रस्त्याची पाहणी केली यानंतर या रस्त्याचे थातुरमातुर काम केले. परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. हे एकंदरीत परिस्थितीवरून दिसून येत असून रोज मरे त्याला कोण रडे, अशी परिस्थिती आंबेवाडी बाजारपेठेतील झाली आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला 16 वर्षांपूर्वी सुरुवात झाली असून सर्व कामे अतिशय संथगतीने सुरु आहेत. कोणत्याही कामाला उत्तम प्रकारचा दर्जा नाही. या मार्गावरील काम निकृष्ट दर्जाचे बनविले आहे. कारण काही ठिकाणच्या जुन्याच मोर्‍यांवर सिमेंटचा रस्ता बनविला आहे, तर बनविलेल्या रस्त्याला तडे गेले आहेत.

Exit mobile version