शेअर बाजारात मोठा घोटाळा

मोदी-शहांवर राहुल गांधींचा निशाणा

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशी शेअर बाजार प्रचंड वाढणार असल्याचं मोदी-शहांनी सांगितलं होतं. त्यानंतर आलेल्या एक्झिट पोल्सने या विधानांना हवा दिली. पण, त्यानंतर 4 जून रोजी शेअर बाजार गडगडला. हा सगळा एक मोठा घोटाळा असून, त्याची चौकशी व्हावी, असा गंभीर आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी करीत पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहांवर निशाणा साधला आहे.हा सर्वात मोठा घोटाळा असून, 30 लाख कोटी रुपयांचं रिटेल गुंतवणुकदारांचं मोठं नुकसान झालं आहे, या घोटाळ्याची चौकशी व्हावी, यासाठी संयुक्त संसदीय समितीची मागणीही गांधी यांनी केली आहे.

राहुल गांधी यांनी गुरुवारी (दि.6) पत्रकार परिषद घेतली. त्यात ते म्हणाले की, ‘लोकसभा निवडणूक सुरू असताना दिलेल्या मुलाखतीत नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी देशातील जनतेला शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, निकालाच्या दिवशी 4 जूनला शेअर बाजार कोसळले. तत्पूर्वी, एक्झिट पोलनंतर 3 जूनला शेअर बाजारात लक्षणीय वाढ झाली होती. पण 4 जून रोजी घसरला. 4 जूनला शेअर बाजार कोसळणार हे माहीत असतानाही मोदी सरकारने शेअर बाजाराबाबत संभ्रम का पसरवला,’ असा सवाल त्यांनी केला.

राहुल गांधी यांनी मीडिया चॅनेल्स आणि सर्व्हे कंपन्यांच्या एक्झिट पोलवरही प्रश्‍न उपस्थित केले. मीडियाने खोटे एक्झिट पोल का दाखवले, असा सवाल त्यांनी केला. गांधी म्हणाले की, ‘निवडणुकीच्या वेळी तत्कालीन पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शेअर बाजारावर भाष्य केले. पंतप्रधान शेअर बाजाराच्या वाढीबद्दल बोलत असताना गृहमंत्र्यांनी सांगितले की, लोकांनी 4 जूनपूर्वी शेअर्स खरेदी करावेत. पण 4 जून रोजी बाजार कोसळला. शेअर बाजारामुळे देशाचे 30 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे आम्ही बनावट एक्झिट पोल आणि शेअर बाजारातील घोटाळ्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी व्हावी अशी अमची मागणी आहे,’ असे राहुल गांधींनी स्पष्ट केले.

Exit mobile version