| मुंबई | प्रतिनिधी |
भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला आहे. मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्या उपस्थिती हा पक्षप्रवेश पार पडला. भाजपने लोकसभेचं तिकीट कापल्याने उन्मेष पाटील नाराज असल्याने ते ठाकरे गटात दाखल झाले आहेत. जळगावमध्ये भाजपने स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर उन्मेष पाटील नाराज असल्याने ठाकरेंच्या शिवसेनेत दाखल झाल्याचं सांगितलं जात आहे.
उन्मेष पाटील यांनी मंगळवारी (दि.2) रोजी थेट मुंबईत दाखल होत खासदार संजय राऊतांची भेट घेतली होती. त्यानंतर मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतही त्यांची बैठक झाली. त्यामुळे उन्मेष पाटील ठाकरे गटात जाण्यावर शिक्कामोर्तब झाला होता. त्यानंतर त्यांनी आज शिवसेना ठाकरे गटात अधिकृत पक्षप्रवेश केला आहे.
यावेळी उन्मेष पाटील म्हणाले, माझी लढाई आत्मसन्मानासाठी आहे. अवहेलना झाल्यामुळे मी वेगळी भूमिका घेतली आहे. मी केलेल्या विकासाची भाजपला किंमत नाही. बदल्याचं राजकारण मनाला वेदना देणारं होतं. उमेदवारी मिळाली नाही म्हणून मी नाराज नाही, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.