तरुणाचा मृत्यू, तरुणी जखमी
| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान येथे पर्यटनासाठी आलेल्या कल्याण महापालिका हद्दीमधील पर्यटकांची दुचाकी घाट रस्त्यात झाडावर आदळली आणि त्या अपघातात दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला तर सोबत असलेली तरुणी गंभीर जखमी झाली असून रायगड हॉस्पिटल येथे उपचार घेत आहे. कल्याण येथील शहाड भागातील रहिवाशी असलेला 25 वर्षीय तरुण विनय संजय भोईर हा आपल्या मामाकडे टिटवाळा येथे राहत होता.त्याची मैत्रीण टिटवाळा भागातील मांडा गावातील असून हे दोघे पर्यटनासाठी कल्याण टिटवाळा येथून माथेरान येथे 21 मार्च रोजी आले होते. विनय हा तरुण आपली क्टिवा स्कूटर (एम एच 05 ईसी 1763) वरून 30 वर्षीय मैत्रीणसह आला होता.
दिवसभर माथेरानमध्ये पर्यटन करून हे दोघे सायंकाळी घरी परतण्यासाठी माथेरान येथून निघाले होते.दस्तुरी येथे पार्किंग करून ठेवलेली दुचाकी घेऊन ते दोघे निघाले असता घाटातून माथेरान येथून नेरळ कडे येत असताना विनय संजय भोईर याचा दुचाकी वरील ताबा सुटला आणि जुम्मापट्टी भागात त्याची दुचाकी तीव्र उतारावर रस्त्याच्या डाव्या बाजूला झाडावर जावून आदळली. हा अपघात झाला त्यावेळी विनय हा गाडीवर उडाला आणि बाजुचे दगडावर आदळला आणि त्या ठिकाणी त्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्या सोबत स्कूटर वरून प्रवास करणारी त्याची 30 वर्षीय मैत्रीण बाजूला झाडीत पडली होती,त्यामुळे तिला मोठी जखम झाली असून तिचा एक पाय निकामी झाला असल्याचे नेरळ पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच नेरळ पोलीस तत्काळ तेथे पोहचले आणि त्यांनी अपघातग्रस्त तरुण विजय संजय भोईर आणि त्याची मैत्रीण यांना तेथून उचलून रूग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला.मात्र दुचाकीस्वार तरुण हा मृत्युमुखी पडल्याने शव विच्छेदन करणेसाठी त्याचा मृतदेह नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवून देण्यात आला.तर जखमी झालेली तरुणी हिला रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.या घटनेची नोंद नेरळ पोलीस ठाणे येथे फेटल अपघात अशी करण्यात आली असून पोलीस हवालदार पिंगळे अपघात घटनेचा अधिक तपास करीत आहेत.