| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी वाड्यांमध्ये 20 मार्च रोजी आढळून आलेला रानगवा हा रस्ता शोधत माथेरान ट्रेनच्या मार्गाने माथेरान गावात पोहचला. माथेरान गावात या नवाख्या असलेल्या प्राण्याबद्दल उत्सुकता दिसून आली,मात्र आदिवासी तरुणांनी त्या रानगव्याला माथेरान मधून सुखरूप बाहेर काढले आणि घाट रस्त्याने खाली आणून जंगलात सोडले.
जानेवारी महिन्याचे अखेरीस रानगवा सर्व प्रथम कर्जत तालुक्यात आढळून आला होता. त्यानंतर हा रानगवा माणगाव, कोल्हारे, तळवडे, पाषणे असा ठाणे जिल्ह्यात गेला होता.हा भला मोठा दिसणारा प्राणी गवत चारा खावून जगत असल्याने आणि कोणालाही त्रास देत नसल्याने त्याला कोणीही त्रास देऊ नये यासाठी वन विभागाकडून त्याला ठाणे जिल्ह्याच्या हद्दीत सोडले होते.मात्र 20 मार्च रोजी पुन्हा अगदी सकाळी माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी वाड्यांमध्ये दिसून आला.स्थानिक आदिवासी ग्रामस्थ आणि वन विभागाचे कर्मचारी यांनी त्या रान गव्याला जंगलात वाट करून दिली होती. मात्र 20मार्च रोजी सायंकाळी माथेरान नेरळ मिनी ट्रेन मार्गावरील पेब किल्ला परिसरात रेल्वे मार्गाने पुढे चालला असल्याचे बेकरे वाडी येथील महिलांनी पाहिले होते. पुढे हा रानगवा माथेरान गावात जाणारा असा कयास वन विभाग यांनी बांधला होता. रात्री जंगलात राहिलेल्या या रानगव्याने सकाळी माथेरान गावात प्रवेश केला आणि तो अजस्त्र प्राणी पाहून अनेकांना भीती वाटली होती. मात्र वन विभागाने त्या प्राण्याबद्दल जनजागृती करून तो दिसल्यास कोणीही दगड मारू नये अशी सूचना केली होती.
त्यानुसार माथेरान मधील काळोखी भागात रेल्वे मार्गाने आल्यावर रानगव्याला स्थानिक तरुणांनी माथेरान मधील रस्त्यांनी पुढे पुढे नेत पुन्हा अमन लॉज स्थानकातून रस्त्याने दस्तूरी वाहनतळ येथे आणले.तेथून रानगव्याला माथेरान नेरळ घाट रस्त्यात मार्ग दाखवल्यावर रानगवा जरा वेगाने घाट उतरत होता, तर त्याच्या मागे काही दुचाकीस्वार हे हळूहळू येत होते. घाटातून हा रानगवा माथेरानच्या पायथ्याशी आला आणि तेथून तो पुन्हा जंगलात गेला आहे. अशाप्रकारे सांगली किंवा भीमाशंकर येथील जंगलात आढलून येणारे रानगवे हे आढळून येत असतात. त्या रान गव्यांच्या दिसण्यामध्ये देखील आपल जंगलं समृध्द आहेत हे सिद्ध होत असते. त्यामुळे कर्जत तालुक्यात आढळून येत असलेल्या रानगव्यामुळे वन विभागात आनंद आहे अशी माहिती माथेरानचे वनक्षेत्रपाल उमेश जंगम यांनी दिली आहे. त्याचवेळी त्यांनी या कोणालाही त्रास न देणार्या प्राण्याला मारू नये किंवा हाकलून देण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन त्यांनी केले आहे.