संपकरी कर्मचार्‍यांना दणका: संपकाळातील वेतनाला बसणार कात्री

| मुंबई | प्रतिनिधी |
जुनी पेन्शन योजना लागू करा, या मागणीसाठी संप करणार्‍या सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांना राज्य शासनानं दणका दिला आहे. संपाच्या काळातील सात दिवसांचा कालावधी असाधारण रजा म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे. त्यामुळं कर्मचार्‍यांचे संपकाळातील वेतन कापले जाणार आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीनंतर राज्यातील सुमारे 17 लाख कर्मचारी आणि शिक्षकांच्या पगारातून सुमारे 1200 कोटी रुपयांची कपात होणार आहे.

दरम्यान, याबाबत कर्मचारी समन्वय समितीचे निमंत्रक विश्‍वास काटकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या आदेशात बदल करण्यासाठी पत्र दिले आहे. काटकर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार होते. मात्र, त्यांना मुख्यमंत्र्यांची वेळ मिळाली नाही. राज्यात जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी राज्यातील सर्व सरकारी-निमसरकारी कर्मचारी आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी दिनांक 14 मार्च ते 20 मार्च याकाळात संप केला होता. या सात दिवसांच्या कालावधीत संपात सहभागी झालेल्या कर्मचारी, शिक्षकांचा पगार कापला जाणार आहे.

समितीचा अहवाल आल्यानंतर निर्णय होणार
राज्यातल्या शिक्षक, शिक्षकेतर शासकीय निमशासकीय कर्मचार्‍यांनी बेमुदत संप पुकारला होता. सुमारे आठवडाभर हा संप सुरू होता. या दरम्यान शासनाने दोन वेळा संघटनेशी बोलणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही बैठक जाली होती. त्यानंतर जुनी पेन्शन योजनेबाबत सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे सरकारनं म्हटलं होतं. त्यासाठी समिती स्थापन केली आहे. सरकारी कर्मचार्‍यांनी संप मागे घेतल्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले होते. कर्मचार्‍यांच्या मागणीबाबत शासन पूर्णतः सकारात्मक असून याकरिता स्थापन समितीचा अहवाल लवकर प्राप्त करून उचित निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी विधानपरिषद, विधानसभेत जाहीर केले होते.

संपामुळं आरोग्य सेवेवर परिणाम
दरम्यान, सरकारी कर्मचार्‍यांच्या संपाला अनेकांनी विरोधही केला होता. या सरकारी कर्मचार्‍यांच्या संपामुळं आरोग्यसेवेवर परिणाम झाला होता. तसेच सर्वसामान्य नागरिकांनादेखील संपाचा फटका बसला होता. त्याचबरोबर अवकाळी पावसामुळं शेतकर्‍यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. या काळात सर्व सरकारी कर्मचारी संपावर असल्यानं पचनामे प्रलंबित राहिले होते.

Exit mobile version