। मुंबई । प्रतिनिधी ।
यंदाचा गणेशोत्सव मागील वर्षी पेक्षा लवकरच म्हणजे २७ ऑगस्टला साजरा होणार आहे. त्यामुळे कोकण रेल्वेने दरवर्षी प्रमाणे यंदाही गणपती स्पेशल गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी कोकणातील चाकरमान्यांना गावी जाण्यासाठी ६० दिवस आधीच रेल्वे गाड्यांचे आरक्षण करावे लागणार आहे. त्यामुळे कोकण रेल्वेच्या नियमित गाड्यांचे आरक्षण २३ जूनपासुन सुरु करावे लागणार आहे.
गणेश चतुर्थीच्या २ दिवस आधी चाकरमानी कोकणात जातात. त्यामुळे २५ आणि २६ ऑगस्टला कोकणात पोहचण्यासाठी त्या दिवसांच्या गाड्यांच्या आरक्षणाला जादा मागणी असते. मागीलवर्षी गणपती उत्सवाची सुरुवात ७ सप्टेंबर रोजी झाली होती. यावर्षी २७ ऑगस्ट रोजी गणपतीचे आगमन होत आहे. त्यामुळे ६० दिवसआधी आगाऊ आरक्षणाच्या तारखांचा तक्ता कोकण रेल्वे प्रशासनाने जाहीर केला आहे. कोकणात जाण्यासाठी रेल्वे गाड्यांना प्रचंड गर्दी होत असल्यामुळे मध्य रेल्वे कोकण रेल्वे मार्गावर २५०हून अधिक गणपती स्पेशल गाड्यांना सोडते. या गाड्यांना देखील मोठी गर्दी असते. मुंबई-गोवा मार्गाची अवस्था अद्यापही बिकट असल्यामुळे यावर्षी देखील जास्त चाकरमानी रेल्वेतून प्रवास करण्याची शक्यता असल्याने त्यादृष्टीने कोकण रेल्वेकडून तयारीला सुरुवात झाली आहे.