12 कृषी सेवा केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याची कारवाई
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रासायनिक खत विक्रीचा मासिक प्रगती अहवाल दरमहा नोंदणी प्राधिकारी व जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी यांना सादर न करणे. दुकानात भावफलक (दर सूची) न लावणे, साठा पुस्तके वेळोवेळी अद्ययावत न ठेवण अशा अनेक करणांवरून जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील 12 कृषी सेवा केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. कृषी सेवा केंद्राला कृषी विभागाने दणका दिला आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रायगड यांच्या सूचनांनुसार कृषी अधिकारी (गुणनियंत्रण) यांच्याकडून जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान रासायनिक खतांचा साठा, दर सूची, गोदामाची नोंदणी तसेच खत विक्री करताना शेतकऱ्यांना एन फॉर्म देणे या सर्व बाबींची पडताळणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान त्रुटींविषयी संबंधित कृषी सेवा केंद्रांना सुधारण्याची वाजवी संधी देण्यात आली. मात्र, संधी देऊनही त्रुटी न दूर करणाऱ्या केंद्रांवर कारवाईची कडक मोहिम हाती घेण्यात आली. शेतकऱ्यांना योग्य दरात आणि नियमबद्ध पद्धतीने रासायनिक खते उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कृषी विभागाने अखेर कठोर भूमिका घेतली. आजअखेरपर्यंत 15 कृषी सेवा केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील चार कृषी सेवा केंद्रांचे परवाने तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना वेठीस धरणे, खते काळ्या बाजारात विकणे किंवा नियमांचे उल्लंघन करणे याबाबत कोणत्याही प्रकारची शिथिलता दाखवली जाणार नाही. विभागामार्फत नियमित तपासण्या सुरू राहतील आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई केली जाईल, असे कृषी विभागाने सांगितले आहे.
कृषी अधिक्षकांकडून आवाहन
शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाच्या सर्व नियमांचे पालन करावे, दरफलक ठळकपणे लावावा, साठा पुस्तके नियमित अद्ययावत ठेवावीत आणि विक्रीवेळी शेतकऱ्यांना आवश्यक पावती व एन फॉर्म देणे बंधनकारक आहे, हे लक्षात घ्यावे, असे आवाहन सर्व कृषी सेवा केंद्र संचालकांना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वंदना शिंदे यांनी केले आहे.







