शिंदे गटाला दणका उद्धव सेनेला दिलासा

लटकेंचा राजीनामा मंजूर होणार ; उच्च न्यायालयाचे मनपाला आदेश

| मुंबई | प्रतिनिधी |

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार असलेल्या ऋतुजा लटके यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. राजीनामा स्वीकारल्याचे पत्र ऋतुजा लटके यांना शुक्रवारी सकाळी 11 वाजेपर्यंत द्या, असा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाने पालिकेला दिला आहे. ठाकरे गटासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. या निर्णयाने शिंदे गटाला मोठा दणका बसला आहे.

महापालिका आयुक्तांनी नोटीस कालावधी शिथिल करण्याचा आपला विशेषाधिकार विशिष्ट पद्धतीने वापरावा, असे न्यायालय सांगू शकत नाही आणि जोपर्यंत राजीनामा स्वीकारला जात नाही तोपर्यंत कर्मचारी पालिकेच्या सेवेतच असते. एक महिना नोटीस असते आणि तेवढ्या कालावधीत आयुक्तांना निर्णय घेण्याचा अधिकार असतो. तो कालावधी संपल्यानंतर राजीनामा स्वीकारला, असे गृहित धरले जाते, असा युक्तिवाद पालिकेतर्फे ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी केला.

माझा राजीनामा विशिष्ट तारखेला किंवा विशिष्ट दिवसांत स्वीकारावा, असे म्हणण्याचा कर्मचार्‍याला अधिकार नाही. तो कधी स्वीकारायचा हा अधिकार नोकरी देणार्‍याचा असतो. अशा प्रकरणांत न्यायालयालाही आदेश देण्याचा अधिकार नसतो. नोटीस कालावधी माफ करून राजीनामा स्वीकारायचा की राजीनामा नाकारायचा हा सर्वस्वी पालिका आयुक्तांचा विशेषाधिकार आहे. या प्रकरणात राजीनामा पत्रही सदोष आहे. शिवाय आता तक्रार आली आहे तर त्याचीही शहानिशा करून ते प्रकरण आधी बंद करावे लागेल. त्यानंतरच राजीनाम्याबाबत निर्णय घेतला जाईल.

राजीनामा तात्काळ स्वीकार व्हावा, असा याचिकादाराला कोणताही कायदेशीर अधिकार नाही. याचिका मुदतीपूर्वीची आहे. त्यामुळे ती फेटाळावी, अशी मागणी पालिकेतर्फे ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी केली होती. सुनावणीदरम्यान राजकीय दबावापोटीच राजीनामा थांबवण्यात आल्याचा आरोप यावेळी ऋतुजा लटके यांच्यावतीने करण्यात आला होता. तर राजीनाम्याची योग्य प्रक्रिया अवलंबली नसल्याचा युक्तिवाद पालिकेने केला होता.

एका सामान्य कर्मचार्‍याच्या राजीनाम्याला एवढे महत्त्व का दिले जात आहे. उलट एका कर्मचार्‍याला निवडणूक लढवायची आहे, तर तुम्ही त्याचा राजीनामा स्वीकारायला हवा. हे प्रकरण इथपर्यंत यायलाच नको होते.

मुंबई उच्च न्यायालय
Exit mobile version