। देवरूख । प्रतिनिधी ।
संगमेश्वर मार्गावरील साडवली येथे दुचाकीला बोलेरोने धडक दिल्याने बुधवारी (दि. 31) अपघात घडला. या अपघातात दुचाकीवरील वृद्धाचा मृत्यू झाला आहे. मनोहर मेस्त्री (70), रा. सांगवे वरचीवाडी असे अपघातात मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे.
या अपघाता प्रकरणी बोलेरो गाडीच्या चालकावर देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची तक्रार ओम रामकृष्ण मेस्त्री रा. सांगवे वरचीवाडी, (20) याने दिली आहे. ओम मेस्त्री हा आपल्या ताब्यातील हीरो होंडा स्प्लेंडर या दुचाकीवरून त्याचे काका मनोहर मेस्त्री यांना कोसुंबहून साडवलीच्या दिशेने घेऊन येत होता. याचवेळी प्रतिक नरेश शिंदे (25), रा. मुंबई हा आपल्या ताब्यातील महेंद्रा कंपनीची बोलेरो घेऊन संगमेश्वरहून देवरुखच्या दिशेने येत होता.
वनाज कंपनीजवळ तुळजा भवानी नगर येथे प्रतिक शिंदे हा ओम मेस्त्रीच्या दुचाकीला ओव्हरटेक करत होता. यावेळी प्रतिक शिंदे याचे बोलेरोवरील नियंत्रण सुटल्याने बोलेरोची ओमच्या दुचाकीला धडक बसली. दुचाकीवर मागे बसलेल्या मनोहर मेस्त्री यांना यावेळी गंभीर दुखापत झाली. हा अपघात 31 रोजी सकाळी 10 वाजता घडला. अपघाताची माहिती मिळताच देवरूख पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मनोहर मेस्त्री यांना तात्काळ देवरूख ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र देवरूख ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टरांनी तासणी करून मृत घोषीत केले देवरूख पोलीस स्थानकाचे पोलीस निरिक्षक उदय झावरे याच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल वेलवणकर अधिक तपास करीत आहेत.
बोलेरोची दुचाकीला जोरदार धडक; वृद्धाचा मृत्यू
