वावडुंगीत चाऱ्यासह बॉम्ब खाल्ल्याने बैलाचा जबडा फाटला
| कोर्लई | प्रतिनिधी |
मुरुड तालुक्यातील वावडुंगी येथे रानात चरायला गेलेल्या बैलाने चाऱ्यासह बॉम्ब खाल्ल्याने बैलाचा जबडा फाटून गंभीर दुखापत झाली असून, शेतकऱ्यांसह प्राणीमित्रांडून हळहळ व्यक्त केली आहे.
मुरुड तालुक्यातील वावडुंगी वरचीवाडी येथील शेतकरी मधुकर रामा भुवड यांच्या मालकीचा हा बैल आहे. काहीजण शिकारीसाठी गावठी बॉम्ब तयार करून रानात ठेवत असल्याचे बोलले जात असून, उन्हाळा असल्याने गुरे काही गावात उनाड सोडली जातात. रानात चरत असताना बैलाने तो गावठी बॉम्ब चाऱ्यासहित खाल्ला आणि स्फोट होऊन त्याचा जबडा फाटला. ही घटना एवढी विदारक आहे कि, तो बैल आता तोंडावाटे काही खाऊ शकणार नाही. प्रचंड वेदना होत असल्याने बैलांच्या डोळ्यात अश्रू वाहत आहेत. जबडा फाटून जीभ लोंबकळत असल्याचे पाहून शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले. नांगराच्या उमद्या बैलाची अवस्था पाहून गावातील सर्व शेतकरी बांधव हळहळ व्यक्त करत आहेत. शेतकऱ्याला आणि त्या बैलाला न्याय मिळावा, अशी भावना व्यक्त केली जात आहे. याबाबत अजित कासार यांनी मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे, मुरुड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेंद्रकुमार खताळ, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. किरण यांना कळविण्यात आले असून जखमी बैलावर उपचार केले जात आहेत.







