पावसामुळे परीक्षण समितीने सर्वेक्षण थांबविले; जिल्ह्यातील 19 स्थानकांचे होणार मूल्यमापन
| रायगड | प्रतिनिधी |
एसटी स्थानक म्हटले की सगळीकडे अस्वच्छता, स्वच्छतागृहांची दुरवस्था, दुर्गंधी, मोडलेल्या खुर्च्या आणि रया गेलेली इमारत असे चित्र सर्वसाधारणपणे दिसते. हे चित्र बदलण्यासाठी स्वच्छ व सुंदर एसटी बसस्थानकांचे अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत रायगड जिल्ह्यातील 19 स्थानकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. पावसामुळे स्थानकांचे सुरु झालेले सर्वेक्षण परीक्षण समिती माघारी गेल्याने रखडले होते. आता पाऊस थांबल्यानंतरही जिल्ह्यातील अर्ध्याहून अधिक स्थानकांचे सर्वेक्षण लांबल्याने स्वच्छ आणि सुंदर स्थानक अभियानाला ब्रेक लागला आहे. यामुळे रायगड जिल्ह्यात प्रवासीवर्गाच्या सेवेसाठी असणाऱ्या बसस्थानकांची आजची स्थिती कागदावर येणार आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाचीही वाहतूक स्वच्छ आणि सुंदर वातावरणात व्हावी, अशी सूचना एसटी महामंडळाचे अध्यक्ष व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यानुसार एसटी महामंडळाने रायगड जिल्ह्यातील 19 एसटी बसस्थानके स्वच्छ, सुंदर बनवण्यासाठी पाऊल उचलले. यासाठी बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान सुरू केले. यात राज्यातील सर्व बसस्थानकांचे मे आणि जून महिन्यातील कामगिरीचे मूल्यमापन जुलैमध्ये करण्यात आले. दर दोन महिन्यांनी हे मूल्यमापन करून अंतिम गुण निश्चित करून विजेती स्थानके ठरविली जाणार आहेत.
यात रायगड विभागातील 19 स्थानकांचे सर्वेक्षण करून त्यांचे मूल्यमापन करण्यात आले. यामध्ये अलिबाग, रेवदंडा, मुरूड, रोहा, तळा, श्रीवर्धन, माणगाव, नागोठणे, वडखळ, रामवाडी, पेण, कर्जत, खोपोली, इंदापूर, महाड, पोलादपूर, पनवेल, उरण आणि खालापूर या स्थानकांचा समावेश आहे. बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान सुरु झाल्यानंतर परीक्षण समित्यांनी जिल्ह्यात सर्वेक्षण सुरु केले. जून आणि जुलै महिन्यात पावसाचा जोर वाढल्याने परीक्षण समित्यांना एसटी स्थानकांचे मूल्यमापन करण्यात अडचणी निर्माण झाल्या. यामुळे समित्यांनी सर्वेक्षण करण्याचे काम थांबविले आहे. सर्वेक्षण थांबल्यामुळे आता स्थानकांना मिळणारे गुण अंतिम झालेले नसल्याने रायगड जिल्ह्यातील उत्तम बसस्थानके कोणती हे सांगणे एसटी महामंडळाला अडचणीचे झाले आहे.
स्वच्छ, सुंदर बस स्थानकांना प्रदेश व विभागनिहाय बक्षिसे दिली जाणार आहेत. पहिला क्रमांक पटकावणाऱ्या बसस्थानकांना प्रदेश व विभागनिहाय 50 लाख, 25 लाख, तर 10 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. या अभियानांतर्गत बसस्थानकांना एकूण दोन कोटींची बक्षिसे दिली जाणार आहेत. सर्व बसस्थानकातील स्वच्छतेचे मूल्यमापन करण्यासाठी परीक्षण समित्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. या समित्या दुसऱ्या विभागात जाऊन दर दोन महिन्यांनी मूल्यमापन करीत आहेत. त्यात बसस्थानक परिसर, स्वच्छतागृह, बसची स्वच्छता, सुशोभिकरण याआधारे गुण दिले जातील. तसेच कर्मचाऱ्यांचे प्रवाशांसोबत सौजन्याने वागणे, उत्पन्नवाढीसाठी केलेली प्रयत्न, बसचे वेळापत्रक अशा प्रकारच्या प्रवासी अभियानासाठी गुण दिले जातात. रायगड जिल्ह्यात असणाऱ्या 19 स्थानकांची आजची स्थिती अत्यंत बिकट आहे. सर्वेक्षणात परीक्षण करणाऱ्या समितीला गुण देणे जिकिरीचे ठरणार आहे.
.
असे असणार स्थानकांना गुण
बसस्थानक, परिसर व स्वच्छतागृहे :
50 गुणबस गाड्यांची स्वच्छता : 25 गुण
कर्मचाऱ्यांची सौज्यनशीलता, प्रवासी अभियान : 25 गुण
रायगड जिल्ह्यातील 19 बसस्थानकांचे मूल्यमापन करण्याची सुरुवात झाली होती. परंतु, जून आणि जुलै महिन्यात पावसाने परीक्षण समित्यांना मूल्यमापन करताना अडचणी येऊ लागल्या. यामुळे सद्यःस्थितीमध्ये बसस्थानकांचे मूल्यमापन थांबले असून, हे मूल्यमापन लवकरच सुरु करण्यात येणार आहे.
दीपक घोडे, विभाग नियंत्रक, एसटी