विद्यार्थी, रुग्ण, वयस्कर बांधवांचे हाल; वाडीवर जायला पक्का रस्ता नाही
| सुकेळी | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत अशी ओळख असलेल्या ऐनघर ग्रामपंचायत हद्दीमधील सुकेळी (गणपतवाडी) येथील आदिवासी बांधव स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंत रस्त्यासारख्या मूलभूत सुविधेपासून वंचित आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून गणपतवाडी ग्रामस्थ या रस्त्याचे काम होण्यासाठी पाठपुरावा करीत आहेत. मात्र, या रस्त्याच्या कामासाठी काही स्थानिक शेतकरी जागा देण्यासाठी अडथळा करीत असल्यामुळे या रस्त्यासाठी अनेक वेळा मंजूर करण्यात आलेला निधीसुद्धा तसाच पडून आहे, तर अनेक वेळा हा निधी परतसुद्धा जात आहे.
मुंबई-गोवा महामार्गापासून काही अंतरावर असलेल्या गणपतवाडी येथील आदिवासी बांधवांना वाडीवर येण्या-जाण्यासाठी प्रलंबित असलेल्या कच्च्या रस्त्याच्या कामात काही शेतकरी अडचण करीत असल्यामुळे अनेक वर्षांपासून खूप त्रास सहन करावा लागत आहे. दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसात तर याचा मोठा सामना करावा लागत आहे. या कच्च्या रस्त्यामुळे शिक्षणासाठी शाळेत जाणाऱ्या मुला-मुलींना चिखल तुडवत जावे लागत असून, नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
वाडीतील गरोदर महिला किंवा वयोवृद्ध व्यक्ती आजारी पडला असेल तर त्यांना रस्ता नसल्यामुळे वाहने वाडीपर्यंत जाऊ शकत नाहीत, त्यामुळे डोलीचा वापर करुन दवाखान्यात घेऊन जावे लागत आहे. त्यामुळे रुग्णालयात योग्य वेळेत पोहोचता न आल्यामुळे अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. या रस्त्याची तहसीलदार यांनी पाहणी करुन प्रश्न लवकरात लवकर मार्गी काढण्यात येईल असे आश्वासन दिले होते. परंतु, अद्यापही याबाबतीत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.
याबाबतीत ऐनघर ग्रामपंचायतीचे सदस्य विनोद निरगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच ग्रामस्थांनी अनेक वेळा या रस्त्याच्या प्रलंबित समस्येबद्दल आवाज उठविला होता. कायम वहिवाटीत असलेला हक्काचा रस्ता मिळावा यासंदर्भात मागणी करुन देखिल या रस्त्याचा मार्ग अद्यापही मोकळा झालेला नाही. तरी लवकरात लवकर या रस्त्याच्या बाबतीत योग्य तो न्याय आम्हा गणपतवाडी आदिवासीबांधवांना मिळावा, अशी मागणी गणपतवाडी ग्रामस्थांकडून होत आहे.