ऑनलाईन औषध विक्रीविरोधात उतरले रस्त्यावर
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
ऑनलाईन औषध विक्रीविरोधासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी रायगड जिल्ह्यातील औषध विक्रेते रस्त्यावर उतरले आहेत. बुधवारी (दि. 20) संपावर गेले आहेत. जिल्ह्यातील दोन हजार औषध विक्रेते या बंदमध्ये सहभागी झाले आहेत. त्याचा फटका जिल्ह्यातील रुग्णांना बसला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर आजारपणासाठी लागणारे औषधे विक्री दुकान बंदमुळे रुग्णांचे प्रचंड हाल झाले आहेत. मागण्यांकडे दुर्लक्ष राहिल्यास हा लढा असाच सुरु राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या नेतृत्वाखाली बंद पाळण्यात आला आहे. रायगड जिल्हा केमिस्ट अँड डिस्ट्रिब्युटर असोसिएशनमार्फत बुधवारी सकाळपासून औषधी विक्रीची दुकाने बंद ठेवली. सकाळी दवाखान्यातून मेडीकलमध्येऔषधे घेण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना परतीचा मार्ग स्विकारावा लागला. औषध विक्रीची दुकाने बंद असल्याने याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर झाला. मात्र, रुग्णांच्या आरोग्याची गरज लक्षात घेऊन अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आली आहे.
औषध विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार, ऑनलाईन औषध विक्रीमुळे औषध क्षेत्रातील अनेक नियमांचे उल्लंघन होत आहे. काही ठिकाणी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधांची विक्री होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. विशेषतः अँटीबायोटिक्सचा चुकीचा वापर वाढण्याबरोबरच बनावट औषधांचा धोका वाढल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. रुग्ण आणि फार्मासिस्ट यांच्यातील प्रत्यक्ष संवाद कमी होत असल्याने औषधांच्या योग्य वापराबाबत मार्गदर्शन मिळत नसल्याची बाबही अधोरेखित करण्यात आली आहे.
मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या आकर्षक सवलती देऊन बाजारपेठ काबीज करत असल्यामुळे छोट्या औषध विक्रेत्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप संघटनांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे ऑनलाईन औषध विक्रीसंदर्भातील धोरणांचा पुनर्विचार करावा आणि संबंधित अधिसूचना रद्द कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.दरम्यान, मागण्यांवर शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशाराही संघटनांनी दिला आहे. रुग्णांना होणाऱ्या संभाव्य गैरसोयीबद्दल संघटनांनी दिलगीर व्यक्त करत असतानाच, औषध व्यवसाय आणि सार्वजनिक आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी हे आंदोलन आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.






