पुरुषांमध्ये मुंबई शहर, महिलांमध्ये पुणे विजयी
। अहमदनगर । प्रतिनिधी ।
मुंबई शहरच्या पुरुषांनी 70 व्या वरिष्ठ गट पुरुष महिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत पुरुषांत सुवर्ण चढाईत जेतेपदाचा मुकुट पटकाविला. महिलांत पुण्याने सलग पाचव्यांदा जेतेपदाची किमया साधली. अहमदनगर जिल्हा हौशी कबड्डी फेडरेशनच्या विद्यमाने नगरच्या वाडिया पार्क मैदानावरील मॅटवर झालेले दोन्ही सामने अत्यंत चुरशीने खेळले गेले. पुरुषांच्या अंतिम सामन्यात मुंबई शहरने यजमान गतविजेते अहमदनगरचा सुवर्ण चढाईत 32-31 असा पराभव करीत श्रीकृष्ण करंडकावर आपले नाव कोरले. मुंबईचे हे या स्पर्धेतील 22 वे जेतेपद.
मुंबईने सुरुवात झोकात करीत मध्यांतराला 12-08 अशी आघाडी घेतली होती. पण शेवटच्या काही मिनिटात नगरनें स्थानिक रसिकांच्या जोशपूर्ण पाठिंब्यावर सामन्याची रंगत वाढविली. सामना संपायला 2 मिनिटे असताना 2 गुणांची आघाडी मुंबईकडे होती. पण नगरनें एक पकड करीत व चढाईत गुण घेत 25-25 अशी बरोबरी साधली. त्यामुळे 5-5 चढायांचा जादा डाव खेळविण्यात आला. यात चौथ्या चढाईत नगरनें पकड करीत व चढाईत गुण घेत आधाडी घेतली होती. पण मुंबईने पाचव्या चढाईत पकड करीत व गुण घेत 5-5 अशी बरोबरी साधली. त्यानंतर सामन्याच्या नियमाप्रमाणे सुवर्ण चढाईचा डाव खेळविण्यात आला. त्यात मुंबई शहराचा विजय झाला.
महिलांचा अंतिम सामना देखील चुरशीचा झाला. त्यात पुण्याने मुंबई शहरला 30-29 असे निसटते चकवीत सलग पाचव्यांदा पार्वतीबाई सांडव चषकावर आपले नाव कोरले. मुंबई शहरला मात्र सलग चौथ्यांदा उपविजेत्यापदावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेतील पुण्याच्या महिलांचे हे 24 वे जेतेपद मिळविले.
पुण्याने आक्रमक सुरुवात करीत पहिल्या डावात 18-11 अशी महत्वपूर्ण आघाडी घेतली. उत्तरार्धात ती वाढवीत नेली. सामना एकतर्फी होणार असे वाटत असतानाच सामन्यात अचानक सनसनाटी निर्माण झाली. मुंबईच्या मेघा कदम हिने एका चढाईत पुण्याचे 4 गडी टिपत सामन्यात चुरस निर्माण केली. यानंतर मुंबईने पुण्यावर लोण देत काही वेळातच 26-26 अशी बरोबरी साधली. पण यातून सावरत पुण्याने एका गुणाने बाजी मारत सलग चौथ्यांदा मुंबईचे स्वप्न भंग केले.