| पनवेल । वार्ताहर ।
सार्वजनिक बांधकाम विभागाने सायन-पनवेल महामार्गावर तीन ठिकाणी खोदकामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे कळंबोली ते वाशी टोलनाक्यादरम्यानच्या 30 मिनिटांच्या अंतरासाठी दररोज दीड ते दोन तासांचा अवधी लागत असल्याने नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पुणे, लोणावळा, पनवेल आणि कोकणातील फार्महाऊसवर जाणार्यांची पार्टी यंदा ट्रॅफिक जॅममध्येच होण्याची शक्यता आहे.
काही वर्षांपूर्वीच कोट्यवधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या सायन-पनवेल महामार्गाची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुरुस्ती करण्यात येत आहे. यासाठी मार्गावरील तीन ठिकाणी खोदकाम केले जात आहे, पण या कामाच्या नियोजनातील त्रुटींमुळे सध्या सायन-पनवेल मार्गावरून प्रवास वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. सायन-पनवेल महामार्गावर कळंबोली, सीबीडी-बेलापूर आणि नेरूळ येथील एलपी उड्डाणपूल यादरम्यान काँक्रीटीकरणाच्या कामासाठी खोदकाम सुरू केले जात आहे. एकाच वेळेस तीन ठिकाणी हे काम केले जात असल्याने मुंबईहून पुण्याकडे जाणार्या दिशेने कळंबोली, सीबीडी-बेलापूर आणि नेरूळ येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. त्यामुळे या भागांमध्ये कार्यालयातून घरी जाणार्या चाकरमान्यांसह पुणे, सातार्याकडे जाणार्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याचे दिसत आहे.
रुग्ण, ज्येष्ठ नागरिकांना मनस्ताप
सायन-पनवेल महामार्गावर लागणार्या वाहतूक कोंडीत बर्याचदा वाहनांमध्ये रुग्णवाहिकाही अडकतात. रुग्णवाहिकेवरील दिवा आणि सायरनच्या आवाजाने काही जण वाट देऊन माणुसकीचे दर्शन घडवतात, पण खासगी वाहनातून प्रवास करणारे आजारी आणि ज्येष्ठ नागरिकांना मात्र मनस्ताप सहन करण्यापलीकडे पर्याय नसतो.