सारथी फाउंडेशनचे देदिप्यमान शैक्षणिक कार्य; पाच जिर्णोद्धारीत शाळा झाल्या पूर्ण
| महाड | प्रतिनिधी |
रायगड किल्ल्याच्या कुशीत वसलेल्या निजामपूर या अति दुर्गम आदिवासी भागात आदिवासींचे मोठ्या वस्तीचे दोन पाडे आहेत. मूलभूत सुविधांपासून कोसो दूर असणाऱ्या ह्या सर्व पाड्यांवर सारथी फाऊंडेशन गेली अनेक वर्षे कार्यरत आहे.
गेल्याच महिन्यात 24 मे रोजी खालच्या आदिवासी पाड्यावर आदिवासी बांधवांना नूतन इमारत राजश्री महादेव सामंत यांच्या आर्थिक सहाय्यातून बांधून देण्यात आली होती. आता दुसऱ्या वरच्या आदिवासी भागात जुन्या मोडकळीस आलेल्या शाळेचा जीर्णोद्धार शहाजीराव आणि रेखा सवदे यांच्या योगदानातून सारथी फाऊंडेशन मार्फत पार पडले आहे. सदरच्या शाळेचे उद्घाटन सोहळा नुकताच तेरा जून रोजी माजी आमदार आणि माजी राज्यमंत्री रमेश शेंडगे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
तालुका महाड, जिल्हा रायगड येथील या धरणग्रस्त पाड्यावर गेली सत्तावीस वर्षे अनेक आदिवासी कुटुंबे वास्तव्यास आहेत. एवढ्या दीर्घ काळातही येथे मूलभूत सुविधा आणि शैक्षणिक सोयींचा कायम अभाव राहिला. पूर्वीची शाळा इमारत पूर्णपणे जीर्ण अवस्थेत होती. छोट्या व तात्पुरत्या खोल्यांमध्ये मुलांना दाटीवाटीने बसावे लागत होते. 1956 रोजी बांधण्यात आलेली ही शाळा वादळी वाऱ्यात थेट धोकादायक बनत होती. या परिस्थितीचा थेट फटका विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बसत होता. रायगड जिल्ह्यात गेली चाळीस वर्षे दुर्गम भागात निस्वार्थपणे कार्यरत असलेले ज्येष्ठ समाजसेवक आणि सारथी फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक जंगले यांच्या निदर्शनास ही दयनीय परिस्थिती आली आणि त्यांनी या विद्यार्थ्यांसाठी नवीन, सुरक्षित व सुसज्ज शाळा उभारण्याचा निर्धार केला. त्यांच्या पुढाकाराने सारथी फाऊंडेशनच्या माध्यमातून आता येथे प्रशस्त वर्गखोली, वीज जोडणी, पंखे आणि ट्यूबलाईटसह सुसज्ज अशी नवी इमारत उभी राहिली आहे. या सोहळ्यास परिसरातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सारथी फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक जंगले, महेश चव्हाण, निलेश पवार, गौरव जंगले, लक्ष्मणराव व्हटकर, सखाराम डोईफोडे, रेखा सवदे, प्रभाकर सावंत, दीपक शेळके, हनुमंतराव साठे यांची उपस्थिती होती. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.







