| चौल | प्रतिनिधी |
दैनिक पुढारीच्यावतीने देण्यात येणारा यंदाचा ‘आदर्श शिक्षक सन्मान 2026′ चौलमळा येथील शिक्षिका तनिष्का नाईक यांना प्रदान करण्यात आला. ठाणे येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात शनिवारी (दि.25) पार पडलेल्या कार्यक्रमात राज्याचे सांस्कृतिक विभाग मंत्री आशिष शेलार, आ. निरंजन डावखरे, आ. संजय केळकर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
‘पुढारी’च्या आदर्श शिक्षक पुरस्काराचे हे यंदाचे पाचवे वर्ष असून, राज्यभरातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय आणि प्रेरणादायी कार्य करणाऱ्या शिक्षकांचा या पुरस्काराने गौरव करण्यात येतो. अध्यापनाच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान देणाऱ्या शिक्षकांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन देण्याचा या पुरस्कारामागील उद्देश आहे.
सध्या अलिबाग तालुक्यातील संचालक मंडळ हायस्कूल नागावमध्ये कार्यरत असलेल्या तनिष्का नाईक यांनी आपल्या अध्यापन कार्यासोबतच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नैतिक मूल्ये, सामाजिक जाणीव आणि आत्मविश्वास निर्माण करण्याबरोबरच त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील असतात. त्या स्वतः तंत्रस्नेही असून, विद्यार्थ्यांना तंत्रस्नेही व सर्वसमावेश अध्यापनासोबत कृत्रीयुक्त प्रात्यक्षिकांवर भर देत असतात. बदलत्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांवर होणारा सामाजिक माध्यमांचा प्रभाव लक्षात घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करणे, विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देणे तसेच सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी त्यांनी विशेष योगदान दिले आहे. आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देत शिक्षणाची गोडी आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचे कामही त्या करीत आहेत.
2003 मध्ये युवा कार्य व क्रीडा मंत्रालयांतर्गत राष्ट्रीय एकात्मता शिबिरामध्ये रायगड जिल्ह्यास विविध बक्षिसे मिळवून देऊन त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. तसेच, कोविड काळात बंद पडलेली संगणक प्रयोगशाळा स्वखर्चातून सुरू करून विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचीही दखल घेण्यात आली. त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील कर्तव्यनिष्ठ, उल्लेखनीय आणि समाजाभिमुख कार्याची दखल घेत ‘पुढारी’कडून त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांचे पती नमित नाईक, सासूबाई शालिनी नाईक, सासरे जयंत नाईक यांच्यासह कुटुंबीय व मान्यवर उपस्थित होते. तनिष्का नाईक यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.







