| सातारा | प्रतिनिधी |
भारतातील अनेक गोष्टींचा जगाला हेवा वाटत असतो. येथील लेण्या, किल्ले, सरोवरांपासून ते जंगल, डोंगराळ रांगाही जगाच्या आकर्षणाचं केंद्र आहे. भारतात असंख्य अशा अद्भुत गोष्टी आहेत. त्यामुळे जगातील पर्यटक भारताकडे आकर्षित होतात. त्यात आता एका म्हशीची भर पडली आहे. या म्हशीची जगाने दखल घेतली आहे. साताऱ्याच्या या म्हशीची थेट गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. त्यामुळे ही म्हैस पाहण्यासाठी देशभरातूनच नव्हे तर जगभरातून लोक येत आहेत.
या म्हशीचं नाव राधा आहे. ही म्हैस जगातील सर्वात लहान म्हैस आहे. त्यामुळे तिला बुटकी राधा म्हणूनही साताऱ्यात ओळखलं जातं. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील मलवडीची ही बुटकी राधा म्हैस आहे. तिची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. या ठेंगण्या ‘राधा’ला पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता लागली असून, प्रत्येक प्रदर्शनात ती सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. मलवडीतील शेतकरी आणि पशुपालक त्रिंबक बोराटे आणि त्यांचा मुलगा अनिकेत बोराटे यांच्या घरच्याच म्हैशीने 19 जून 2022 रोजी ‘राधा’ला जन्म दिला. पण तिची उंचीच वाढत नसल्याने सर्वांच्या आकर्षणाची ती केंद्र झाली आहे.
राधा दोन-अडीच वर्षाची झाल्यावर तिच्या उंचीतला बदल त्रिंबक बोराटे यांच्या लक्षात आला. त्यानंतर बोराटे यांचा कृषी पदवीधर मुलगा अनिकेत याने राधाला कृषी प्रदर्शनात सहभागी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, सुरुवातीला कोणीच त्याला प्रतिसाद दिला नाही. 21 डिसेंबर 2024 सोलापूर येथील सिध्देश्वर कृषी प्रदर्शनात पहिल्यांदा राधाने सहभाग घेतला. अन् राधाचा सर्वत्र बोलबाला सुरू झाला. त्यानंतर पुसेगावचे सेवागिरी कृषी प्रदर्शन आणि कर्नाटकातील निपाणी येथील कृषी प्रदर्शनासह एकूण 13 कृषी प्रदर्शनात भाग घेतला. या प्रदर्शनांमध्ये खास आकर्षण म्हणून राधाला निमंत्रित करण्यात आलं होतं.
अन् गिनीज बुकात गेली
24 जानेवारी 2025 रोजी राधाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंद झाली. परभणी येथील कृषी प्रदर्शनानंतर अनिकेत याने 'राधा'च्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी प्रयत्न सुरू केले. 12 सप्टेंबर 2025 ला राधाची पाहणी करुन अहवाल पाठवला. 20 सप्टेंबरला कागदपत्रे सादर केली. आणि राधाची जगातील सर्वात बुटकी म्हैस म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली. यामुळे यानंतर राधाचे म्हशीचे मालक यांच्यावर कौतुकांचा वर्ष होताना पाहायला मिळत आहे.







