इन्फ्लुएंझाची काळजी घेण्याचे आवाहन

। तळा । वार्ताहर ।
सध्या राज्यावर संकट असलेल्या इन्फ्लुएंझा विषाणूबाबत काळजी घ्यावी असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.गजेंद्र मोधे यांच्याकडून तळा तालुक्यातील नागरिकांना करण्यात आले आहे. कोरोना विषाणू नंतर राज्यावर इन्फ्लुएंझा विषाणूचा धोका संभावला आहे.यामुळे नागरिकांनी न घाबरता काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.

या विषाणू पासून काळजी घेण्यासाठी नागरिकांनी काही नियम पाळणे गरजेचे आहे ज्यामध्ये वारंवार साबण व स्वच्छ पाण्याने हात धुणे,पौष्टिक आहार घेणे,धुम्रपान टाळणे, पुरेशी झोप आणि विश्रांती घेणे, भरपूर पाणी पिणे, लिंबु, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या यासारख्या आरोग्यदायी पदार्थांचा आहारात वापर करणे गरजेचे आहे. तसेच इन्फ्लुएंझा विषाणूची लागण होऊ नये यासाठी हस्तांदोलन करणे टाळावे, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये,डॉक्टरांच्या सल्याशिवाय औषध घेऊ नये, आपल्याला फ्लू सदृश्य लक्षणे असतील तर गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये यांसारखी बंधने पाळणे आवश्यक असल्याचे डॉ.गजेंद्र मोधे यांनी सांगितले.

Exit mobile version