| रसायनी | प्रतिनिधी |
चांभार्ली येथे राहणारे भानुदास जांभळे हे आपल्या टाटा टीयागो (एमएच-46-एयू-6906) गाडीने दांड फाट्यावरून चांभार्लीकडे जात होते. त्यावेळी रिस भटवाडीच्या स्टॉपच्या अलिकडे पूलावर त्यांच्या कारपुढे एका अज्ञात मोटारसायकलस्वाराने आपली मोटारसायकल थांबवली. यावेळी भानुदास जांभळे यांनी मोटारसायकल गाडीच्यामध्ये का थांबविली अशी विचारणा केली. त्यावेळी त्याने तुम्ही आमच्या साहेबांच्या मोटारसायकलला तुमच्या कारने घासले असल्याचे सांगितले. तुम्ही आमच्या साहेबांकडे चला असे सांगितले. यावेळी भानुदास जांभळे दुसऱ्या व्यक्तीकडे गेले तेव्हा त्याने तुम्ही माझ्या मोटारसायकलला कार घासून नुकसान केले आणि तुम्ही पोलीस स्टेशनला चला, असे सांगितले. तसेच, माझा माणूस कार घेऊन पोलीस स्टेशनला येईल तुम्ही माझ्याबरोबर मोटारसायकलवर चला, असे सांगितले. दुसऱ्या व्यक्तीने जांभळे यांच्याकडून कारची चावी घेतली तो कार घेऊन निघाला. तसेच, मोटार सायकलवाल्यानेही भानुदास जांभळे हे बसण्याआधीच मोटारसायकलवरून पळ काढला. भानुदास जांभळे यांना फूस लावून आपली कार चोरट्यांनी पळवून नेल्याचे लक्षात आले. त्यांनी ताबडतोब रसायनी पोलीस ठाण्यात जावून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. रसायनी पोलिसांनी शोध लावला असता कार वडखळजवळ अपघात अवस्थेत सापडली. यावेळी कारचे भरपूर नुकसान झाल्याचे भानूदास जांभळे यांच्या लक्षात आले.







