| नवी मुंबई | वार्ताहर |
रस्त्यालगत उभ्या असलेल्या डंपरला भरधाव कार धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.20) सकाळी सायन-पनवेल महामार्गावर जुईनगर येथे घडली आहे. नरेंद्र रॉय (45) असे मृत अधिकाऱ्याचे नाव आहे. या अपघात अन्य दोन अधिकारी जखमी झाले असून नेरुळ पोलिसांनी डंपर चालकाला ताब्यात घेतले आहे. मुंबई विमानतळावर कार्यरत असलेले नरेंद्र रॉय सहकारी गौरव विजयशंकर सिंह (44) आणि अभिनव रामकुमार सिन्हा (45) हे तिघे शनिवारची रात्रपाळी करून रविवारी सकाळी बेलापूरला परतत होते. सकाळी साडेनऊच्या सुमारास जुईनगर येथे एका मोटारसायकलस्वारास वाचवण्याच्या नादात कारचालकाने कार बाजूला घेण्याचा प्रयत्न केला, मात्र ती डम्परला धडकली. या अपघातात कारचालकासह तिघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र नरेंद्र रॉय यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अन्य दोघांची प्रकृती गंभीर असून, कारचालक किरकोळ जखमी झाले आहेत.