| पनवेल | प्रतिनिधी |
कामोठे परिसरातील एका नामांकित शाळेत सहा वर्षांच्या चिमुकल्यावर शिक्षकांकडून मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी दोन महिला शिक्षिकांविरोधात बाल न्याय अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पालकवर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे. कामोठे पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सेक्टर 24 येथील एका शाळेत सहा वर्षीय विद्यार्थ्याला दोनवेळा दोन वेगवेगळ्या शिक्षिकांकडून मारहाणीचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
पीडित पालकांनी दिलेल्या तक्रारीनूसार 14 आणि 28 नोव्हेंबरला मारहाणीची घटना शाळेत घडली. शाळकरी मुलांच्या आपसातमधील भांडणावरून याची सुरूवात झाली. संशयीत आरोपी वर्गशिक्षिकेने 14 नोव्हेंबरला दुपारी 1 ते 2 या वेळेत दुसऱ्या वर्गातील एका विद्यार्थिनीला बोलावून पिडीत मुलाच्या गालावर पाच ते सहा वेळा मारण्यास सांगितले.
ही घटना घडत असताना संबंधित शिक्षिका हसत असल्याचा आरोप तक्रारीत पालकांनी केला. त्यानंतर दूसरी घटना 28 नोव्हेंबरला सकाळी 11 ते 11.30 या वेळेत इंग्रजी विषयाच्या शिक्षिकाच्या हाती घडली. या शिक्षिकेने विद्यार्थ्याच्या तोंडावर कंपास बॉक्सने मारहाण केली. या मारहाणीत मुलाचा ओठ सुजल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दोन्ही घटनांमुळे मुलाला शारीरिक तसेच मानसिक त्रास सहन करावा लागल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
तक्रारदारांनी याबाबत यापूर्वी शाळा व्यवस्थापनाकडे दाद मागितली. मात्र, शाळा व्यवस्थापनाच्या प्रतिसादावर असमाधान झाल्याने पालकांनी पोलीस ठाण्यात अर्ज केला होता. पोलिसांनी प्राथमिक चौकशीनंतर आणि शाळा व्यवस्थापनाचे जबाब नोंदविल्यानंतर मंगळवारी रात्री गुन्हा नोंद केला. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद मसलकर हे करीत आहेत. नोव्हेंबर महिन्यात अशाच प्रकारची मारहाण एका विद्यार्थीनीला खारघर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाल्याने विद्यार्थ्यांच्या सूरक्षेविषयी चिंता व्यक्त केली जात असताना ही दूसरी घटना कामोठे येथे घडली. या दोन्ही घटनांमुळे शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी पालकवर्गाकडून करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून मारहाण करणे या गुन्ह्याला सात वर्षांपेक्षा अधिक काळ शिक्षा होत नसल्याने या प्रकरणी तपास अधिकारी मसलकर यांनी संबंधित शिक्षकांना या प्रकरणी नोटीस बजावली.
मारहाण करणाऱ्या शिक्षिकांविरोधात गुन्हा
