। नवीन पनवेल । वार्ताहर ।
बेशिस्तपणे वाहने उभी करण्याच्या प्रकारामुळे कामोठे शहरात वादावादीचे प्रकार वाढले आहेत. सेक्टर 34 मधील मोरेश्वर हाईट्स इमारतीच्या प्रवेशद्वारासमोर असाच एक प्रकार समोर आला असून इमारतीच्या सुरक्षारक्षकाला मारहाण करण्यात आली आहे.
कामोठेतील नागरिकांना वाहने कुठे उभी करायची, ही समस्या भेडसावत आहे. एका वाहनचालकाने रात्रीच्या वेळी चारचाकी वाहन उभे केले होते. यावेळी इमारतीचा सुरक्षारक्षक प्रमोद सिंग याने वाहनचालकाला इमारतीच्या प्रवेशद्वारासमोर वाहन उभे करण्यास मनाई केली. याचा राग मनात धरून वाहनचालकाने सिंगला शिवीगाळ करून मारहाण करून पसार झाला. याप्रकरणी सिंग यांच्या तक्रारीवरून कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाहनांच्या संख्येत वाढ
कामोठे, जुई, नौपाडा गावातील अरुंद रस्त्यांमुळे दुचाकी, रिक्षा, चारचाकी वाहने दारासमोर उभी करण्यात येत असल्यामुळे रहदारीसाठी रस्ते अपुरे पडत आहेत. शहरात साधारण घरटी एक दुचाकी किंवा चारचाकी वाहने आहेत. रिक्षाची संख्या वाढतच आहे. त्यामुळे गृहनिर्माण संस्थांमध्ये वाहने उभी करण्यासाठी जागा अपुरी आहे. त्यामुळे गृहनिर्माण संस्थांच्या आवारातच वाहने उभी केली जात आहेत; पण या इमारतींच्या नागरिकांकडून वाहने उभी करण्यास मज्जाव होत असल्याने वादावादीच्या घटना वाढल्या आहेत.
कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासन योग्य कारवाई करत आहे. वाहनचालकांनी बेशिस्तपणे वाहने उभी करू नयेत.
– स्मिता जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कामोठे