। रसायनी । वार्ताहर ।
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले असून पोलिसांनी याबाबत ठिकठिकाणी असणार्या अवैध धंद्यांवर निर्बंध लावले आहेत. अशातच मोहोपाडा-आपटा रोडवरून अवैधरित्या देशी-विदेशी दारूची बेकायदेशीर वाहतूक होणार असल्याची माहिती गन्हे शाखेला मिळाली होती. दरम्यान, 3 वाजण्याच्या सुमारास दारू घेऊन जाणार्या रिक्षावर पाळत ठेवून असताना एकापाठोपाठ अशा दोन संशयित रिक्षा (एमएच-46-एझेड-2446) व (एमएच-46-एझेड-4825) या मोहोपाडाकडून येत असताना त्यांनी थांबविल्या. त्यामध्ये सिटवरील बॉक्समध्ये 3 लाख 608 रूपये किंमतीची दारू आढळून आली. याबाबत रिक्षाचालक सुरेश बाळकृष्ण गायकर (66) व महेंद्र शरद जाधव (45) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






