। नेरळ । प्रतिनिधी ।
पनवेल-कर्जत रेल्वेच्या दुसर्या मार्गाचे काम करताना 23 ठेकेदारांनी निष्काळजीपणे केलेल्या ब्लास्टिंगमुळे किरवली गावातील आई आणि मुलगा यांना आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. किरवली गावातील मयत सचिन बडेकर आणि त्यांची आई देवका बडेकर यांच्या मृतदेहावर शनिवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर मावळ विधानसभा मतदार संघाचे खा. श्रीरंग बारणे यांनी बडेकर कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली आहे.
कर्जत चौक रस्त्यापासून साधारण 30 मीटर अंतरावर हे ब्लास्टिंग करण्यात आले असून ब्लास्टिंग करताना कोणतीच काळजी न घेता आणि मार्गावरील वाहतूक विशिष्ट अंतरावर न थांबवता ब्लास्टिंग केल्याने निष्पाप मायलेकाला जीव गमवावा लागला. ब्लास्टिंगमुळे सात बाईकस्वार गंभीर जखमी झाले आहेत. ब्लास्टिंगमध्ये उडालेले दगड रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांवर आल्याने दुकानदार देखील जखमी झाले असून दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचवेळी ट्रॅकच्या वरच्या बाजूला असलेला डंपरनेही पेट घेतला. डंपरच्या डिझेल टाकीचा आणि टायरचा स्फोट झाला. या सर्व घटनांची खासदार बारणे यांनी माहिती घेतली.
यावेळी बारणे यांनी सांगितले की, प्रशासनाकडून मायतांच्या कुटुंबाला पुर्णपणे मदत केली जाईल. प्रशासकीय अधिकारी, रेल्वे अधिकारी तसेच ठेकेदारशी चर्चा केली आहे. प्रशासन बडेकर कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची माहितीही त्यांनी दिली.
या अपघातात सचिन महादू बडेकर आणि देवका महादु बडेकर यांना ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे प्राण गमवावे लागले. त्यामुळे दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे बारणे यांनी संगितले. घटनास्थळावर खासदार श्रीरंग बारणे यांच्यासोबत खालापूरचे तहसिलदार आयुब तांबोळी, उपविभागीय अधिकारी संजय शुक्ला, खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळा कुंभार आदी उपस्थित होते. कर्जत पंचायत समितीचे माजी उपसभापती मनोहर थोरवे, माजी नगरसेवक बालाजी विचारे उपस्थित होते.