सात कर्मचाऱ्यांनाही केलं निलंबित
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
संसदेतील काल झालेल्या घुसखोरीच्या घटनेनंतर सुरक्षेतील त्रुटी समोर आल्या आहेत. या प्रकरणी लोकसभा सचिवालयानं सर्वात मोठी कारवाई केली आहे. संसदेवरील हल्ल्यात सुरक्षेतील त्रुटींसाठी जबाबदार असलेल्या 7 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार आणखी लोकांवर कारवाई होऊ शकते.
संसदेवर कडक सुरक्षा व्यवस्था बुधवारी (दि.13) झालेल्या सुरक्षा भंगाच्या घटनेनंतर संसदेत सुरक्षा वाढवण्यात आली होती. मकर गेटमधून केवळ खासदारांनाच संसद भवनात प्रवेश दिला जात असून इमारतीत प्रवेश करणाऱ्या सर्व व्यक्तींचे बूट काढून त्यांची कसून तपासणी केली जात आहे.
लोकसभेत स्मोक बॉम्ब सोडणाऱ्या सहा आरोपींपैकी चौघांना अटक करण्यात आली आहे, एक पोलिस कोठडीत असून सहाव्या आरोपीचा शोध सुरू आहे. अटक करण्यात आलेले चार आरोपी अमोल, नीलम, सागर शर्मा आणि मनोरंजन यांना दिल्ली पोलिस आज पटियाला हाऊस कोर्टात हजर करणार आहेत. पोलीस या आरोपींची कोठडी मागणार आहेत.
चौघांवर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल घुसखोरी करणाऱ्या चौघांवर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने ही माहिती दिली आहे. संसदेच्या सुरक्षेतील त्रुटीप्रकरणी चौकशी समितीही स्थापन करण्यात आली आहे. तर संसदेतील घुसखोरीवर गृहमंत्री आज संसदेत निवेदन देण्याची शक्यता आहे. पोलिस तपासाबाबत गृहमंत्री अमित शाह दोन्ही सभागृहात माहिती देणार आहे. केंद्रीय गृह खात्यानं अनिश दयाल सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती स्थापन केली आहे. ज्यामध्ये इतर सुरक्षा संस्था आणि तज्ञ सदस्य आहेत. चौकशी समिती संसदेच्या सुरक्षेच्या भंगाच्या कारणांची चौकशी करेल, त्रुटी ओळखून पुढील कारवाईची शिफारस करेल. संसदेतील सुरक्षा सुधारण्याच्या सूचनांसह ही समिती आपला अहवाल लवकरात लवकर सादर करेल.
या आरोपींना आश्रय देणाऱ्या विकी शर्मा आणि त्याच्या पत्नीला ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या या प्रकरणातील चार आरोपींचा साथीदार ललित झा याचा पोलीस शोध घेत आहेत.