उताऱ्यात फेरफार नोंदीसाठी पाच हजारांची लाच मागितल्याचा आरोप
| रायगड | प्रतिनिधी |
जमिनीच्या 7/12 उताऱ्यावर फेरफार नोंद करून देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागितल्याचा गंभीर आरोप पेण तालुक्यातील तलाठी सचिन सीताराम घुमाड (35) यांच्यावर करण्यात आला असून, याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पेण येथे अधिकृत तक्रार दाखल झाल्यानंतर प्राथमिक चौकशीत आरोपात तथ्य आढळून आले आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आल्याने महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहितीनुसार, तक्रारदाराच्या मालकीच्या मौजे कांदळे, पेण येथील सर्व्हे नं. 89 जमिनीबाबत 7/12 उताऱ्यात फेरफार नोंद करण्यासाठी संबंधित कार्यालयात रीतसर अर्ज करण्यात आला होता. मात्र, सदर काम करून देण्यासाठी तलाठी सचिन घुमाड यांनी तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांची लाच मागितल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. शासकीय कर्तव्य बजावताना बेकायदेशीर आर्थिक मागणी केल्याचा आरोप झाल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर एससीबी पेण विभागाने कायद्यानुसार पडताळणी कारवाई हाती घेतली. या कारवाईदरम्यान संबंधित अधिकाऱ्याने लाच मागणी केल्याचे स्पष्टपणे निष्पन्न झाल्याने पेण कार्यालयात क्रमांक 2/2025 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.






