सुजित कावळे यांना माणगाव पोलिसांनी केली अटक
| खास प्रतिनिधी | रायगड |
मुंबई-गोवा महामार्गाचे निकृष्ट दर्जाचे काम करणार्या ठेकेदाराविरोधात माणगाव पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. याप्रकरणी मे. चेतक एंटरप्रायझेस लि.चे व्यवस्थापकीय संचालक हुकमीचंद जैन, अवधेशकुमार सिंह, प्रकल्प समन्वयक अभियंता सुजित कावळे यांच्यावर माणगाव पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. माणगाव पोलिसांनी याप्रकरणी सुजित कावळे यांना अटक केली आहे, अशी माहिती रायगडचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.
गेल्या 12 वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडले आहे. हजारो कोटी रुपये खर्च करुनदेखील अद्याप काम पूर्ण झालेले नाही. या मार्गावरुन प्रवास करताना प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. तसेच विविध अपघातांमध्ये अनेकांचे प्राण गेले असून, काही जखमी झाले आहेत. काही दिवसांपूर्वी याप्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सन 2020 पासून आजपर्यंत एकूण 170 अपघात या महामार्गावर झाले आहेत. त्यामध्ये 97 प्रवाशांच्या मृत्यूस, तसेच 208 प्रवाशांच्या लहान-मोठ्या स्वरुपाच्या गंभीर, किरकोळ दुखापतीस आणि अपघातग्रस्त वाहनांच्या मोठ्या प्रमाणावरील दुखापतीस कारणीभूत असल्याचा ठपका पोलिसांनी आरोपींवर ठेवला आहे.