हेडफोन वापरणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल

| खोपोली | प्रतिनिधी |

पनवेल-खोपोली मार्गावर कानाला हेडफोन लावून वेगात बस चालवणाऱ्या एसटीच्या चालकावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास चालक मुंबई ते घोडेगाव बस वेगाने चालवत होता. याच वेळी लौजी येथील रहिवासी दिनेश राठोड आपल्या दुचाकीने पनवेल-खोपोली असा प्रवास करीत होते. बस चालकाने एका मोठ्या वाहनाला ओव्हरटेक केले आणि तो पुढे निघून गेला. याचवेळी तेथून जाणाऱ्या राठोड यांच्या वाहनाला त्याने हुलकावणी दिल्याने त्यांचा अपघात होता-होता टळला आणि ते बचावले.

यावेळी चालक कानाला हेडफोन लावून बस चालवित असल्याचे राठोड यांच्या लक्षात आहे. त्यांनी शिळफाटा स्थानकात थांबलेल्या या बसच्या चालकाला विचारणा केली असता त्याने अरेरावीची भाषा आणि शिवीगाळ करत येथून निघून जा, मला बस कशी चालवायची ते शिकाऊ नको, अशी उद्धट भाषा वापरली. त्यामुळे राठोड यांनी तत्काळ पोलिसांत तक्रार केली.

कानाला हेडफोन लावून वाहन चालविण्यास बंदी असताना अनेक चालक या बंदीचे उल्लंघन करतात. प्रवासी वाहतूक करणाऱ्या एसटीचे चालक, तर हेडफोन वापरण्यात आघाडीवर असल्याचे सर्रासपणे दिसून येते. त्यावर तक्रारीही होत असतात. परंतु एसटीचे अधिकारी, प्रादेशिक विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष का करतात, असा संतप्त सवाल विचारला जात आहे. चार दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गावर ट्रकवर आदळलेल्या प्रवासी टेम्पोचा चालक वाहन चालविताना मोबाईलवर चक्क सिनेमा पाहत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Exit mobile version